
खेड तालुक्यातील सुकीवली देऊळवाडी परिसरातील जगबुडी नदी पात्रात अवैध रित्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडून सुद्धा वाळू माफियांवर कठोर कारवाई होत नसल्याने सुकीवाली येथील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.
नदीपात्रात अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांवर महसूल विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दरवर्षी या नदीपात्रात अवैध वाळू उत्खननाचा गोरख धंदा सुरु असतो. मात्र महसूल विभागाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने या वाळू माफियांना महसूल विभागाचा छुपा पाठिंबा तर नाही ना अशी शंका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
खेड तालुक्यातील वडगाव, कुडोशी आणि सुकीवली या गावांच्या हद्दीत येणाऱ्या जगबुडी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू अवैध वाळू उत्खनन केले जाते. या उत्खननाबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहित नाही असे नाही परंतु महसूल कर्मचाऱ्यांचेही या धंद्यात हात गुंतलेले असल्याने अवैध वाळू उत्खननाचा गोरख धंदा बिनबोभाटपणे सुरूच आहे. गतवर्षी सुकीवली नजीक नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करण्यात आले होते. येथील ग्रामस्थांनी ग्रामस्थनी वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांना रंगेहाथ पकडून महसूल खात्याच्या ताब्यात दिले होते. मात्र त्यावेळी महसूल विभागाकडून कठोर कारवाई न झाल्याने आता पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून या उत्खननबाबत महसूल विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे आता लेखी तक्रार करण्यात आली आहे.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर महसुल विभागाचे कर्मचारी यांनी सुकीवली देउळवाडी नजीकच्या जगबुडी नदी परिसराची पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन इसम चाळणीने वाळू चाळूण त्याचे ढीग बनवताना आढळून आले. महसुलाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. परंतु वाळू माफियांविरोधात कोणत्याही प्रकरची फौजदारी कारवाई केलेली नाही.
महसूल विभागाकडून कठोर कारवाई होत नसल्याने वाळू माफियांना चाप बसणार नसल्याने सुकीवली येथील ग्रामस्थांनी वाळू माफियांच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. या पुढे नदीपात्रात वाळू उत्खननाचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थानी महसुलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. वाळू माफियांवर केवळ पंचनामा व दंड अशी किरकोळ कारवाई न करता महसूल विभागाने या प्रकरणी ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थामधून होत आहे.
































































