
अफगाणिस्तावर कब्जा केलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानशी सलोख्याचे संबंध ठेवणार असून पाकिस्तानसोबतच्या वादात पडणार नसल्याचे सुरुवातीला स्पष्ट केले होते. मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कश्मीर मिळविण्यासाठी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरने तालिबानकडे मदत मागितली असल्याचे समजते. इंडिया टुडेने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
तालिबानने 15 ऑगस्टला अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. त्यानंतर काही दिवसांनी जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा देखील कंदहार येथे पोहोचला. मसूदने त्यानंतर तालिबानचा नेचा मुल्ला अब्दुल घनी बरादर याची भेट घेतली. यावेळी मसूदने कश्मीर खोरे मिळविण्यासाठी तालिबानकडे मदत मागितल्याचे समजते.
अफगाणिस्तावर कब्जा केलेल्या तालिबानी दहशतवाद्यांनी हिंदुस्थानशी सलोख्याचे संबंध ठेवणार असल्याचे स्पष्ट केले होते. आम्हाला हिंदुस्थानशी चांगले आणि सलोख्याचे संबंध ठेवायचे असल्याचे तालिबानच्या प्रवक्याने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानातील राजदूत अफगाणिस्तानात सुरक्षित असून त्यांना घाबरण्याची गरज नाही. तसेच कोणालाही देश सोडण्याची गरज नसल्याचेही तालिबानने स्पष्ट केले आहे.
आम्हांला हिंदुस्थानशी चांगले आणि सलोख्याचे संबंध हवे असल्याचे तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी सांगितले. हिंदुस्थानातील राजदूत आणि अधिकारी अफगाणिस्तानात सुरक्षित असून कोणालाही देश सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तालिबानला हिंदुस्थानशी चांगले संबंध हवे असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान संबंधांबाबत कोणतेही वक्तव्य करणे टाळले आहे.


























































