
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणार्या वाळू माफियांवर महसूल यंत्रणा कारवाई करत असली तरी वाळू माफियांचे धाडस कमी होताना दिसत नाही. त्यातच कारवाई करणार्या अधिकार्यांवर हल्ले होत आहे. तरसोद फाटा-नशिराबाददरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी सोपान रामनाथ कासार यांच्या पथकावर सात ते आठ वाळूमाफियांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेत लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने उपजिल्हाधिकारी कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विठ्ठल पाटील नामक संशयितास एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, तहसीलदार विजय बनसोडे हे अन्य दोघांसह शासकीय वाहनाने (एम एच २८, सी ६४२१) गेले होते. यावेळी त्यांना अवैध वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर दिसले. यापैकी एक डंपर न थांबता पुढे गेले. मात्र पथकाने या डम्परचा पाठलाग करून पकडले. मात्र त्याठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. यात कासार यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यावेळी जखमी कासार यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी भेट विचारपूस केली.



























































