
सामना प्रतिनिधी। जळगाव
भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीकडून खडका चौफुलीकडे बुलेटवरून फिरण्यासाठी आलेल्या तीन मित्रांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिवपूर-कन्हाळा फाट्यावर शनिवारी घडली. शेख वाजीद शेख रफिक (22) शेख समीर शेख हमीद (24) व शेख जावेद शेख मोहिनोद्दीन (22) अशी मृत तरूणांची नावे आहेत.
हे तिघे मित्र प्लॉट भुसावळ हे नाहाटा चौफुलीकडून खडका चौफुलीकडे बुलेट क्र. एम.एच.19 डीई9146 ने फिरण्यासाठी आले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शिवपुर-कन्हाळा फाट्यावर बुलेटला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघा मित्रांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने शेख वाजीद शेख रफिक , शेख समीर शेख हमीद व शेख जावेद शेख मोहिनोद्दीन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दोन्ही बाजुकडील वाहतुक ठप्प झाली होती. वरणगाव ग्रामीण रूग्णालयात या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे जाम मोहल्ला भागात शोककळा पसरली आहे. आज सकाळी या तिघांना शोकमय वातावरणात दफन करण्यात आले. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
































































