
सामना ऑनलाईन । हिंगोली
मुलीसोबत लग्न का करुन देत नाही, या कारणावरुन मुलीच्या वडिलांच्या पोटात गुप्तीने वार करून एका माथेफिरूने त्यांचा खून केला. या माथेफिरूने वादात मध्यस्थी करायला गेलेल्यावरही जीवघेणा हल्ला केला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिसांनी 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐन भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सचिन नारायण सुरनर याने गावातील अमोल शिंदे यांच्या बहिणीस लग्नाची मागणी घातली. सचिन हा व्यसनाधीन असल्याने अमोल शिंदे याने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. नकारामुळे वेडापिसा झालेल्या सचिन आणि त्याचा साथीदार किरण याने मुलीचे वडील कैलास माणिकराव शिंदे (४५) यांच्या पोटात गुप्तीने वार केले. या हल्ल्यामध्ये कैलास शिंदे यांचा मृत्यू झाला. भुजंग धोंडबा शिंदे यांनी कैलास शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्यावरही सचिनने हल्ला केला असून ते यात गंभीर जखमी झाले आहेत. भुजंग शिंदे यांना नितीन कवडे, विश्वनाथ कवडे, गणेश कवडे यांनीही बेदम मारहाण केली आहे. सेनगाव पोलिसांनी सचिन आणि त्याच्या 4 साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

































































