जिओने व्होडाफोन, एअरटेलची वाट लावली, जून महिन्यात 59 लाख ग्राहकांनी पाठ फिरवली

एकेकाळी टेलिकॉम क्षेत्रावर व्होडाफोन आणि एअरटेलचं असलेलं वर्चस्व होतं. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केला आणि या दोन कंपन्यांच्या साम्राज्याला हादरे बसायला सुरुवात झाले. जिओच्या आकर्षक सेवांमुळे व्होडाफोन आणि एअरटेलच्या अनेक ग्राहकांनी जिओची सेवा घ्यायला सुरुवात केली आहे. एकट्या जून महिन्यात व्होडाफोनने 48 लाख ग्राहक गमावले आहेत तर एअरटेलने जून महिन्यात 11 लाख ग्राहक गमावले आहेत. दुसरीकडे जिओच्या ग्राहकांच्या संख्येत मात्र झपाट्याने वाढ होत असून जून महिन्यात 45 लाख ग्राहकांनी जिओची सेवा स्वीकारली आहे.

आकड्यांकडे पाहिल्यास जिओने व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या तोंडाला फेस आणल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. नव्याने जोडल्या गेलेल्या ग्राहकांमुळ जिओची सेवा स्वीकारलेल्या एकूण ग्राहकांची संख्या आता 39 कोटींपर्यंत पोहोचली आहे. डिसेंबर 2019मध्ये दरवृद्धीनंतर इतर कंपन्यांच्या ग्राहकांनी जिओची सेवा स्वीकारण्याची संख्या झपाट्याने वाढत गेल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल यांनी 3 वर्षांत पहिल्यांदा प्रीपेड दर वाढवण्याचा निर्णय घेतला होता. हे दर 14 टक्क्यांवरून 33 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊन काळात अनेक ग्राहकांनी रिचार्ज करण्याची आर्थिक ऐपत नसल्याने मोबाईल सेवा वापरणं सोडून दिलं होतं. त्याचा फटका प्रामुख्याने व्होडाफोन आणि एअरटेलला बसल्याचे दिसते आहे.

ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये जिओचे ग्राहक 39 कोटी झाल्याचे दिसून आले आहेत. व्होडाफोन आणि आयडिया यांच्या एकत्र येण्यानंतर व्हीआय या ब्रँडच्या ग्राहकांची संख्या 30.5 कोटी झाली आहे. एअरटेलच्या ग्राहकांची संख्या 31.6 इतकी झाली आहे. ग्राहक बाजारात जिओचा बाजार हिस्सा 34.82 टक्के झाला असून भारती एअरटेलचा बाजार हिस्सा घटून 27.76 इतका झाला आहे. व्हीआय (व्होडाफोन-आयडिया) यांचा बाजार हिस्सा एका महिन्यात 27.09 वरून 26.75 टक्के इतका झाला आहे.

हिंदुस्थानात सध्याच्या घडीला 114 कोटी मोबाईल सेवा वापरणारे ग्राहक आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ कंपनीने या क्षेत्रात पाय ठेवल्यापासून प्रस्थापित कंपन्यांना हादरे द्यायला सुरुवात केली होती. लॉकडाऊन काळात इतर व्यवसाय संकटात असताना मुकेश अंबानी यांनी जिओमधील काही टक्के हिस्सेदारी विकून 2 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक जमा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या