
मराठी सिनेसृष्टीत खलनायक व नाटय़ दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नावे येथील दानवे परिवारातर्फे दरवर्षी देण्यात येणारा यंदाचा 14 वा ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार’ रंगकर्मी संदीप कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
कोल्हापुरातील दसरा चौकात असणाऱया राजर्षी शाहू स्मारक भवन येथे 1 मार्चला पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक जयश्री दानवे, राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी दिली आहे.
‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘डोंबिवली रिटर्न’, ‘गैर’, ‘टेरिटरी’ अशा चित्रपटांतून तसेच ‘गुंतता हृदय हे’, ‘अवंतिका’ अशा मालिकांतून घरोघरी पोहोचलेले संदीप कुलकर्णी हे आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते आहेत. संदीप कुलकर्णी यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. आजपर्यंत दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, सदाशिव अमरापूरकर, शरद पोंक्षे, अरुण नलावडे, सुबोध भावे, प्रशांत दामले, डॉ. गिरीश ओक, भरत जाधव, अविनाश व ऐश्वर्या नारकर, महेश कोठारे, सचिन खेडेकर, सचिन पिळगांवकर अशा रंगकर्मींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी जयशंकर दानवे यांची कन्या व ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या ‘स्वरांचे चांदणे (गायक-गायिका), अनवट (मराठी संगीतकार), आस्वाद (कथासंग्रह) या पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. कलायात्री पुरस्कार वितरणानंतर संदीप कुलकर्णींच्या प्रकट मुलाखतीतून त्यांच्या अभिनय प्रवासाचा आढावा ताराराणी विद्यापीठातील कमला कॉलेजच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुजय पाटील घेणार आहेत.






























































