नाथ ‘कमल’ दलात? पैसा आणि सत्तेच्या बळावर भाजपकडून नेत्यांचे ‘किडनॅपिंग’ सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपकडून पैसा आणि सत्तेच्या बळावर विरोधी पक्षातील नेत्यांचे खुलेआम किडनॅपिंग सुरू आहे. ‘आदर्श’ घोटाळ्याच्या चौकशीची भीती दाखवत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला. त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी भाजपने गळ टाकला आहे. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे कॉँग्रेसचा हात सोडून कमळाबाईच्या वळचणीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा दारुण पराभव झाला. या मानहानीकारक पराभवानंतर कमलनाथ यांना तडकाफडकी प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवत निवडणुकीत पराभूत झालेल्या जितू पटवारी यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यामुळे कमलनाथ आणि त्यांचे समर्थक आमदार मागील काही दिवसांपासून कॉँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत. कमलनाथ शनिवारी अचानक आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून तातडीने दिल्लीला रवाना झाले. या सर्व घडामोडी घडत असताना त्यांचे पुत्र नकुलनाथ यांनी सोशल मीडियावरील प्रोफाईलमधून काँग्रेसचा उल्लेख हटवल्याने कमलनाथ पिता-पुत्र कॉँग्रेसचा हात सोडणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

भाजपकडून जय श्रीराम म्हणत पिता-पुत्रांचे फोटो शेअर
मध्य प्रदेशचे भाजपा प्रवत्ते आणि कमलनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार नरेंद्र सलूजा यांनी कमलनाथ आणि नकुलनाथ यांचे पह्टो एक्स या मायक्रोप्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. तसेच या फोटोंसह ‘जय श्री राम’ असे कॅप्शन दिले आहे.

निकटवर्तीयांकडून दुजोरा
कमलनाथ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी मंत्री सज्जन सिंग वर्मा कमलनाथ आणि त्यांचे पुत्र भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यांनी स्वतःही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काँग्रेसचा लोगो हटवला आहे. पूर्वी पंजा चिन्हासह त्यांचा फोटो होता, मात्र आता कोणत्याही पक्षाचा लोगो नाही.

विकले जाणारे पक्ष सोडतात – दिग्विजय
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह म्हणाले की, जे घाबरले आहेत किंवा विकले जात आहेत ते सोडत आहेत. कमलनाथ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा करू नये, असे सांगत कमलनाथ कॉँग्रेस सोडणार असल्याची शक्यता त्यांनी फेटाळली.
नकुलनाथ यांनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील सर्व प्रोफाईलवरून काँग्रेससंबंधीची माहिती हटवत काँग्रेसला रामराम करणार असल्याचे संकेत दिले.