कांजूरमार्गमधील शिवसेनेचा मराठी दांडिया हाऊसफुल्ल

‘तु गं दुर्गा, तू भवानी’, ‘आली आली हो गोंधळाला आई’ अशा अस्सल  लोकगीतांसह सध्या गाजणा-या मराठमोळ्या रिमिक्स गाण्यांवर मनसोक्त थिरकण्यासाठी ‘मराठी दांडिया’ला मुंबईकरांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतोय. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विक्रोळी विधानसभेच्यावतीने कांजूरमार्ग पूर्व येथील परिवार गार्डन येथे आयोजित मराठी दांडियाची यंदाच्या नवरात्रौत्सवात सर्वत्र असलेली क्रेझ पाहता उद्या, रविवारी देखील गरबाप्रेमींची येथे अक्षरशः झुंबड उडणार आहे.

मुंबईत काही ठिकाणी दांडियाच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जातात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांच्या संकल्पनेतून यंदा मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सर्वांना यात विनामूल्य प्रवेश आहे. नवरात्रीच्या नवरंगात रंगून मराठी दांडिया खेळण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच येथे तुफान गर्दी होत आहे. भव्यदिव्य आणि आकर्षक स्टेज, रोषणाईने उजळून निघालेला परिसर, दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल येथे पाहायला मिळतेय. बच्चेकंपनी, तरूणाई आणि महिलावर्ग पारंपरिक वेशभूषेत येथे सहभागी होऊन मराठमोळ्या गाण्यांवर मनसोक्त थिरकताना दिसत आहेत.

मराठी सेलिब्रेटींची मांदियाळी 

मराठी कलाकार देखील मराठी दांडियाच्या प्रेमात पडल्याचे दिसून येते. आपल्या व्यस्त शेडयुलमधून वेळ काढत सोनाली कुलकर्णी, संतोष जुवेकर, सुरभी हांडे, रसिका वेंगुर्लेकर, अरुण कदम, योगिता चव्हाण, प्रभाकर मोरे, प्राजक्ता माळी, प्राजक्ता गायकवाड, भाग्यश्री दळवी, दत्तु मोरे आदी कलाकारांनी देखील मराठी दांडियात आवर्जून हजेरी लावत मराठी गाण्यांवर ठेका धरला.