
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केल्यानंतर आता कन्नड रक्षण वेदिका या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लपून छपून रात्रीच्या अंधारात सांगली जिह्यातील जत तालुक्यात घुसखोरी केली आणि पाणी प्रश्नावरून तेथील लोकांना भडकविण्याचा प्रयत्न केला. कन्नडिगांच्या आगळिकीमुळे महाराष्ट्रातील जनता संतप्त झाली आहे.
जत तालुक्यातील पाणी प्रश्नावरून तेथील पाणी संघर्ष समितीने महाराष्ट्र सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन पाणी प्रश्नावर निर्णय घ्यावा, असे येथील लोकांचे म्हणणे आहे. मात्र महाराष्ट्रातील हा प्रश्न असताना कन्नडीगांनी येथे घुसखोरी केल्यामुळे जत तालुक्यातील जनता संतप्त झाली आहे.
लपूनछपून रात्री 10 वाजता आले
कन्नड रक्षण वेदिकेचा नेता सिद्धु वडेयार याच्या नेतृत्वाखाली आठ ते दहाजण रात्री दहाच्या सुमारास जत तालुक्यातील बालगाव येथे आले. बालगाव हे विजापूरपासून अवघ्या 30 किमीवर आहे. बालगावच्या एका आश्रमात कन्नडीगांनी जत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते सुनील पोतदार यांचा सत्कार करून त्यांना भुवनेश्वरी देवीची प्रतिमा भेट दिली. कर्नाटकात आल्यानंतर जत तालुक्याला पाणी, रस्ते, इतर सुविधा देऊ असे अमिष कन्नड रक्षण वेदिकेने यावेळी दाखवले.
सीमावादात अमित शहा यांनी तातडीने लक्ष घालावे – संजय राऊत
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून रक्तपात होण्याची भीती व्यक्त करताना संघर्ष टाळण्यासाठी या वादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने लक्ष घालावे, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. एकमेकांवर बंदुका रोखायला हा काही आसाम-मेघालयचा वाद नाही. प्रत्येक बाबतीत राजकारण करू नका, असे ठणकावताना हा वाद चिघळू न देण्याची जबाबदारी केंद्राची असल्याचेही राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात या वादावर सुनावणी होत असताना दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात घुसण्याची भाषा करतात, तेथील संघटना सांगलीतील गावात घुसून झेंडे फडकावते, काल अचानक मला बेळगाव न्यायालय समन्स बजावते, हे सगळं काय चाललं आहे? ही क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे. यामागे नेमके काय राजकारण आहे? कर्नाटकमध्ये होणाऱया निवडणुकीशी तर याचा संबंध नाही ना, असा सवाल राऊत यांनी केला. या सगळ्यावर ठोस भूमिका न घेणाऱया मिंधे सरकारचाही राऊत यांनी समाचार घेतला.
कन्नड रक्षण वेदिकेचे हे कार्यकर्ते तीन दिवसांपूर्वी लपून-छपून रात्रीच्या अंधारात आल्याचे वृत्त आहे. ज्या आश्रमात त्यांनी बैठक घेतली तेथे बालगाव, तिकोंडी, उमदी या सीमेलगतच्या गावातील मोजकेच लोक उपस्थित होते.

































































