
सामना ऑनलाईन । मुंबई
मध्य रेल्वेने धोकादायक असलेला कल्याणचा पत्री पूल हटविल्यानंतर आता कर्नाक बंदरचा 150 वर्षे जुना उड्डाण पूल पाडण्याचे नवे आव्हान मध्य रेल्वेसमोर उभे राहिले आहे. हा पूलही जीर्ण झाल्याने तो तातडीने पाडण्यात यावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने मध्य रेल्वेला केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी येथील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळून मोठा अपघात झाल्यानंतर रेल्वेने सर्वच पुलांचे सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कल्याणचा पत्री पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापूर्वी सॅण्डहर्स्ट रोड येथील हँकॉक पुलाला 2016 मध्ये हटविण्यात आले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदरदरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर पुलाला हटविण्याचे शिवधनुष्य मध्य रेल्वेला पेलावे लागणार आहे. 1868 साली बांधलेला कर्नाक बंदर पूल सध्या जीर्णावस्थेत असून त्यावरून हलक्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर आता पुन्हा पालिकेने मध्य रेल्वेला या पुलाला लवकरात लवकर हटविण्याच्या हालचाली करण्यास सांगितले आहे.
आधी कर्नाक पूल तोडू नये
हँकॉक पूल बांधण्याआधीच जर कर्नाक बंदरचा पूल हटविला तर येथील वाहतुकीचे पुरते तीनतेरा वाजतील असे रहिवाशांचे म्हणणे आहे. हे दोन्ही पूल एकाच वेळेस नसतील तर पी. डी’मेलो रोडला पूर्व-पश्चिम जोडणारा दुवाच नष्ट होऊन वाहतुकीची कोंडी होणार असल्याने हँकॉक पूल पूर्ण झाल्याशिवाय कर्नाक बंदर पूल तोडू नये असे तज्ञांचे म्हणणे आहे.
हँकॉक पुलाचे भिजत घोंगडे
हँकॉक पूल हटविल्यानंतर नवीन पूल बांधण्यासाठी पालिकेने 51 कोटी रुपये मंजूर केले, मात्र दोन वर्षांनंतर फेब्रुवारी 2018 मध्ये हा पूल बांधण्यास प्रत्यक्षात हालचाल झाली. परंतु नव्याने पूल बांधताना त्याची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुळांच्या कडेला असणारी काही बांधकामे बाधित होत आहेत. त्यांचे पुनर्वसन कोणी करावे यावरून हँकॉक पुलाचे भिजत घोंगडे पडले आहे.






























































