वरळीतील ‘खेळियाड’ला लाभला दणदणीत प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वरळीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळियाड’ या क्रीडा महोत्सवाला दणदणीत प्रतिसाद लाभला. जांबोरी मैदानात विविध खेळांचे सामने पाहण्यासाठी समस्त वरळीकरांची उपस्थिती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या क्रीडा महोत्सवाअंतर्गत घेण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यतीत लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत हिरिरीने सहभाग घेतला.

वरळी युनायटेड स्पोर्टस् असोसिएशन आणि शिवसह्याद्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा वरळीमध्ये विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रोख पारितोषिक, ट्रॉफी, पदकांसह विजेत्यांना भरघोस बक्षीस या ‘खेळियाड’मध्ये मिळाली. सध्या लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वच मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. खासकरून लहान मुलांनाही मोबाईलचे घातक व्यसनच जडले आहे. याचा मोठा परिणाम मुलांवर होतोय. त्यामुळेच मोबाईलमधून बाहेर पडत मैदानी खेळांची मुलांना आवड जडावी यासाठी ही बक्षिसांची लयलूट करणारी स्पर्धा आयोजित केल्याचे शिवसह्याद्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांनी सांगितले. या ‘खेळियाड’ला खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, नगरसेवक आशीष चेंबूरकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, ‘कॉमेडी एक्स्प्रेस’फेम भूषण कडू, नेटोबेट सीईओ स्वानंद कामत, नगरसेवक संतोष खरात, मनीष भालेकर यांनी हजेरी लावत स्पर्धकांचा उत्साह वाढवला. महेंद्र चव्हाण, कुणाल केळुस्कर, सुदर्शन वरसे, प्रकाश नारकर, विनायक चौधरी, विजय घोरपडे, नितीन कदम यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.