किल्लारी सह परिसरात गुटखा विक्री जोमात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी। किल्लारी

महाराष्ट्रात “गुटखा बंदी’ केवळ नावालाच असून औसा तालुक्‍यातील किल्लारी, लामजना, गुबाळ, सिरसल सह परिसरातील ग्रामीण भागातील टपऱ्या व दुकानांवरही सर्रास खुलेआम गुटखा विक्री जोरात सुरू आहे. तीन पट वाढीव किंमतीला गुटखा विक्री केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागापुढे गुटखा विक्री रोखणे आव्हान ठरत आहे. किल्लारी , लामजना, गुबाळ, सिरसल, येथे किराणा दुकान पानपट्टी व शाळा महाविद्यालयाच्या परिसरात दुकाने थाटली असून सर्रास गुटखा विक्री केली जात आहे.

महाराष्ट्रात जुलै 2012 ला गुटखा बंदी करण्यात आली. गुटखा बंदी कायद्याचे सर्वत्र स्वागत करण्यात आले. या गुटक्यामुळे लोकांचा मृत्यू होत असून 90 टक्‍के लोकांना तोंडाचा कर्करोग होवून मृत्यू होतो.

गुटखा खाऊन रस्ते, शासकीय कार्यालय, चौक, बस स्थानक, वर्दळीच्या ठिकाणी थुंकून परिसर अस्वच्छ केला जातो. शासनाच्या तंबाखूजन्य व गुटखा पदार्थ विक्री कायद्याला ढाब्यावर बसून औसा तालुक्‍यातील किल्लारी, किल्लारी पाटी, सिरसल,गुबाळ, नादुर्गा लामजना आदी भागासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू आहे.

अन्न व औषध प्रशासन परवाना तसेच कारवाई यातच त्यांचा वेळ जात असून त्यांना गुटखा किंगवर कारवाई करण्यासाठी वेळच मिळत नाही. या गुटख्याचे पेव ग्रामीण भागात पसरले असून खुलेआम गुटखा विक्री केली जाते. गाव व शहरातील टपऱ्या व दुकानदार गुटख्याची मागणी करताच विमल गुटख्याची 5 रुपये किंमतीची पुडी 10 रुपयाला, तर काही कंपन्यांच्या गुटख्याची 7 रुपये किंमतीची पुडी 30 रुपयाला विकली जाते.

परराज्यातील किल्लारीत चोरट्या मार्गाने वाहतूक सुरू आहे. या वाहनातून आलेला गुटखा मोठ्या हुशारीने उतरवून घेत साठवणूक करून रात्रीच टपऱ्या व दुकानदारांना विकला जातो. तर ग्रामीण भागात विक्रेत्यांचा सहाय्याने पाठविला जातो.संबधिताना गुटखा विक्रीबाबत विचारले असता, आमचे काम नाही, ते अन्न व औषध प्रशासन विभागाचे आहे असे सांगण्यात येते.

किल्लारी व परिसरातील गुटखा विक्री बंद करावे अन्न व औषध प्रशासन विभागाने किल्लारी व परिसरातील गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.