
रशिया-ब्रिटनमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडालेला असताना आता हुकुमशहा किम जोंग उन याने दिलेल्या एका इशाऱ्यामुळे उत्तर कोरिया या देशात घबराट पसरली आहे. हिवाळा तोंडावर आला असून या काळात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोरोना होईल असा इशारा किम जोंग उन याने दिला आहे. यामुळे उत्तर कोरियात घबराट पसरली असून लोकांना हिवाळ्यात अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हिवाळ्यात कोरोना विषाणूविरुद्ध उपाययोजना मजबूत करण्यासाठी उत्तर कोरियाने गुरुवारी आपल्या नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी या साथीच्या रोगाविरूद्ध जागरुक रहावे आणि सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले. विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यात किम जोंग उन याने विषाणूविरुद्ध एक योजना आखली होती. कोरोनाला रोखण्यासाठी सीमांवर बफर झोन तयार करण्यात आले होते. याच दरम्यान उत्तर कोरिया प्रशासनाने आमच्या देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला होता.
दरम्यान, उत्तर कोरियातील प्रसिद्धीमाध्यमे फ्रिज सिद्धांत मांडत असून अनेक दावे करत आहेत. धुम्रपान करणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका अधिक असतो, तसेच स्थलांतरित पक्षी किंवा बर्फवृष्टीमुळेही विषाणू पसरू शकतो, असे दावे करण्यात येत आहे. कोरोना विषाणू अशा प्रकारेही पसरू शकतो यावर त्यांचा अजूनही विश्वास असून आता तर हुकुमशहा किम जोंग उन यानेही असाच इशारा दिल्याने या देशात सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाला हलके घेऊ नका, महाग पडेल , डब्ल्यूएचओचा 53 देशांना इशारा
रशियात मृत्यूचे तांडव
रशियामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबलेला नाही. गुरुवारी या देशात विक्रमी 1 हजार 195 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 40 हजार 217 लोकांना कोरोनाची लागण झाली. रशियात एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 86 लाखांवर पोहोचली असून आतापर्यंत 2 लाख 43 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
हिंदुस्थानमधील परिस्थिती
हिंदुस्थानमध्ये गेल्या 24 तासात 12 हजार 729 रुग्णांची नोंद झाली असून 221 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 12 हजार 165 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या देशात 1 लाख 48 हजार 922 सक्रिय रुग्ण आहे. तसेच आतापर्यंत 107 कोटी 70 लाख 46 हजार 116 लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

























































