सोमय्या पिता-पुत्रांना पीएचडी प्रकरण भोवणार? युवासेनेची चौकशीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासात घेतलेली डॉक्टरेट (पीएचडी) पदवी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. किरीट सोमय्या यांच्या पीएचडीबाबत युवासेनेने मुंबई विद्यापीठाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत कागदपत्रे मागवली होती. मात्र विद्यापीठाकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आले नाही. तसेच थिसीस विभागासह इतर विभागांमध्ये चौकशी केली असता कोणतेही कागदपत्रे त्यांच्याकडे सापडली नाहीत.

नील सोमय्या यांना देखील मुंबई विद्यापीठाची पीएचडी देण्यात आली आहे. त्यांची विद्यापीठाची नोंदणी नंतर फक्त एक वर्षाच्या आत प्रक्रिया पूर्ण केली आहे. अनेक विद्यार्थी किमान तीन वर्षे त्यांच्या विषयांवर अभ्यास करीत असतात तरी त्यांची पीएचडी पूर्ण होत नाही, मग नील सोमय्या यांची एक वर्षाच्या आत पूर्ण कशी झाली याबाबत शंका वाटते. तरी याप्रकरणाची देखील सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी युवासेनेने केली आहे.

युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, शशिकांत झोरे आणि शितल शेठ देवरुखकर यांनी प्रभारी कुलगुरु डॉ.अजय भामरे यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसेच याबाबत कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्याकडेही तक्रार करण्यात येणार असल्याचे युवासेनेने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एकतीस वर्षीय मुलगा नील याने अवघ्या 16 महिन्यांत पीएचडी पूर्ण करून प्राध्यापक, विचारवंत या सर्वांना अचंबित केले. नील सोमय्या यांच्या ‘पीएचडी’साठी प्रचंड वेगाने धावपळ करणाऱ्या मुंबई विद्यापीठाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज्यात ‘ईडी’ सरकार आल्यानंतरच डॉक्टरकीचे कागद वेगाने फडफडल्याचे तारखांवरून स्पष्ट झाले आहे.

जून 2021 ते 1 ऑक्टोबर 2022

– नील सोमय्या यांना मुंबई विद्यापीठाने 1 ऑक्टोबर 2022 रोजी पीएचडी जाहीर केली आहे. मात्र त्या आधीचा दीड वर्षाचा प्रवास लक्षात घ्या…
– नील सोमय्या यांनी पीएचडी एण्ट्रस टेस्ट (PET) 2016 मध्ये दिली आणि 2017 मध्ये सिडनॅहम मॅनेजमेंट महाविद्यालयात प्रवेश घेतला असला तरी ‘पीएचडी’चा खरा प्रवास सुरू झाला तो 1 जून 2021 पासूनच.
– ‘अ स्टडी ऑफ पर्सेप्शन अॅण्ड सोशल मीडिया इम्पॅक्ट ऑन पोलिटिकल पार्टी इमेज’ हा विषय नील यांनी निवडल्याचे मुंबई विद्यापीठाला 1 जून 2021 रोजी कळवले.
– त्यानंतर 17 ऑगस्ट 2022 रोजी सोमय्या यांनी विद्यापीठाकडे प्रबंध सादर केला.
– 30 सप्टेंबर 2022 रोजी त्यांची ‘मौखिक परीक्षा’ (VIVA) झाली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांना पीएचडीही मिळाली.