कोकण रेल्वे आजपासून होणार सुसाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळी वेळापत्रकानुसार गेले काही महिने मर्यादित वेगाने धावणारी कोकण रेल्वे आजपासून सुसाट वेगाने धावणार आहे. आजपासून कोकण रेल्वेचा वेग तशी 110 असणार असल्याने कोकण रेल्वे मार्गात धीम्या गतीने प्रवास करून कंटाळलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

कोकण मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी संपुष्टात आले. 1 नोव्हेंबर म्हणजे आजपासून कोकणरेल्वेचे सुधारित वेळापत्रक लागू झाल्याने सर्वच गाड्यांचा वेग आता वाढला आहे.

कोकण रेल्वे हा मार्ग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून जाणारा मार्ग आहे. पावसाळ्यात या मार्गावर दरडी कोसळण्याची मोठी भीती असते. त्यामुळे पावसाळयात या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे 10 जूनपासून रेल्वे गाड्या ताशी 75 च्या वेगाने धावत होत्या. अतिवृष्टी दरम्यान तर हा वेग केवळ ताशी 40 इतका होता. तसे निर्देशच लोकोपायलटना देण्यात आले होते.

31 ऑक्टोबरला पावसाळी वेळापत्रकाची मुदत संपली आणि कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचा वेग पुन्हा एकदा सुसाट झाला. आजपासून या गाड्या तशी 110 या वेगाने धावणार आहेत. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान होणार आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.