आम्ही कोल्हापूरच्या रणरागिणी!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 शीतल धनावडे ,[email protected]

कोल्हापूर. कुस्तीच्या आखाडय़ांचे शहर… मराठमोळय़ा मर्दानी खेळांचे शहर… या मर्दानी खेळातील आखाडय़ात मुलींची संख्या लक्षणीय वाढतेय. शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साक्षी माजगावकर या तरुणीने दांडपट्टय़ाने 359 लिंबे काही क्षणांत कापून दाखवली… मुलींना प्रोत्साहन मिळावं म्हणून येथे काही आखाडे हे मर्दानी खेळ मुलींना विनामूल्य शिकवतात. जाणून घेऊया या रणरागिणींच्या खेळाविषयी…

सह्याद्रीच्या कडेकपारीत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी अजरामर इतिहास निर्माण केला ती युद्धकला आणि हत्यारे आजच्या संगणकीय आणि स्पर्धेच्या युगात विस्मृतीत जात असली तरीही काही शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींकडून ही शिवकालीन युद्धकला आणि हत्यारे चालविण्याचे कसब आजही जतन केले जात आहे. विशेषत आज सर्वत्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण पाहिल्यास शिवकालीन मर्दानी युद्धकलेचे प्रशिक्षण घेणाऱया महिलांचे प्रमाण वाढल्याचे समाधानकारक चित्र आहे.

कोल्हापुरात 100हून अधिक आखाडे होते. कालांतराने ते कमी होत गेले. काही आखाडय़ातून जे शिष्य तयार झाले त्यांनी स्वतःचे नवीन आखाडे तयार केले. तरीही आता कोल्हापुरात फक्त अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आखाडे, तालीम युद्धकलेची जोपासना करतात. या आखाडय़ांद्वारे मुलींसाठी शिबिरं आयोजित केली जातात. सुट्टीच्या दिवशी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, तर काही ठिकाणी दररोज सायंकाळी प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये गरजेनुसार मुलींना विनामूल्य प्रशिक्षण दिलं जातं. एखाद्या मुलीची घरची परिस्थिती चांगली असले तर तिच्याकडून फी घेतली जाते. कारण आखाडय़ातील साहित्यासाठी खर्च लागतो. जिथे आवश्यकता आहे, तिथेच नाममात्र शुल्क घेतलं जातं. काही आखाडय़ांमध्ये मुलींना वयाच्या 4थ्या वर्षापासून प्रशिक्षण देतात. महाविद्यालयीन युवतीही आखाडय़ात स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षण घेण्यासाठी जातात. आत्मसंरक्षणासाठी, अंगी चपळता यावी, मानसिक संतुलन वाढावं यासाठी मुलींना प्रशिक्षण दिलं जातं. आखाडय़ा-आखाडय़ांमध्ये स्पर्धांचंही आयोजन केलं जातं. यामुळे मुलींना प्रोत्साहन मिळतं. यामध्ये मुलांना ‘रणरागिणी’ आणि मुलांना ‘मावळा’ म्हटलं जातं.

शंभुराजे मर्दानीची रणरागिणी स्वाती इंगळे या युवतीने सन 2004 मध्ये सलग पंधरा तास पंधरा मिनिटे दोन काठय़ा फिरवून लिम्का बुकमध्ये नोंद केली. महाराष्ट्रातील किंबहुना देशातील ही पहिलीच नोंद झाल्याने, साहजिकच या युद्धकलेचा प्रसार पुन्हा जोमाने सुरू झाला.

यंदा या आखाडय़ाच्या साक्षी माजगावकर या रणरागिणीने तब्बल 359 लिंबू न थांबता दांडपट्टय़ाने मारुन शिवप्रतापदिनी शिवरायांना आणि मावळय़ांना आदरांजली वाहिली. अनेक तालीम मंडळातील सर्व वयोगटातील महिला पुरुषांच्या बरोबरीनेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करताना पाहावयास मिळतात. शिवाय अनेक खेळाडूंना ठिकठिकाणी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांतून रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. आजही बहुतांश सर्वच तालीम आखाडय़ांतून सर्व वयोगटातील मुलामुलींना या प्राचीन व शिवकालीन युद्धकलेचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देण्यात येते.

साक्षी माजगांवकर रणरागिणी (शिवशाहू मर्दानी आखाडा)

इतिहासाची आवड आणि उत्सुकता यातून वयाच्या अकराव्या वर्षापासून इतर खेळांपेक्षा या युद्धकलेचा सराव करत आहे. दररोज यासाठी सायंकाळी आठ ते साडेनऊपर्यंत आखाडय़ात सराव केला जातो. तिच्यासह पंचवीसहून अधिक मुली दररोज सरावासाठी येतात. आतापर्यंत तिने लाठी-काठी, तलवारबाजी, भालाफेक आणि दांडपट्टा ही शस्त्र चालविण्याचे कसब मिळविले आहे. आखाडय़ाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळयांच्या देदिप्यमान कर्तृत्वाची प्रेरणा मिळते.

विवाहानंतरही प्रशिक्षण देणाऱया रणरागिणी

शंभुराजे मर्दानी खेळ विकासमंचच्या रणरागिणींनी विवाहानंतरही ही युद्धकला जोपासली आहे. शिवाय सासरी अनेक शाळांमध्येही मुलामुलींना आजही प्रशिक्षण देत आहे. आपला शौर्यशाली इतिहास, संस्कृती आणि हत्यारांचे जतन यांसह मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे हाच उद्देश आहे.

मुलींना खेळाबाबत काय वाटतं?

मर्दानी खेळांचं प्रशिक्षण घेणाऱया मुलींमध्ये शिवकालीन खेळांची आवड दिसून येते. कोल्हापूर शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अंबाबाईचा, शिवाजी महाराजांचा रथोत्सव, संस्थानकालांची परंपरा जपण्यासाठी शाहू महाराजांनी सुरू केलेले कार्यक्रम येथे आजही सुरू आहेत. या काळात मुलींची पथकं पाहणाऱयाला प्रेरणा देतात. अशा प्रेरणा देणाऱया मर्दानी खेळात सहभागी होणं ही मुलींसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे मुलींना वाटते. पालकही आपल्या मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी अग्रेसर असतात. महत्त्वाचे म्हणजे मुलींवर कोणत्याही प्रकारची अन्यायाची घटना घडल्याचे कधीही ऐकिवात नाही.

प्रशिक्षण, आहार, सराव

अंडी, दूध, केळी, लिंबू सरबत, पौष्टिक लाडू, सुकामेवा, पालेभाज्या असा सकस आहार तालीम करणाऱया खेळाडूंना घ्यायला हवा.

शरीरातील पाण्याचं प्रमाण, स्नायू, श्वसन आणि हृदयाची कार्यक्षमता व्यायामाद्वारे वाढते. त्यामुळे दररोज व्यायाम, सरावाला महत्त्व आहे.

दररोज सराव करण्यापूर्वी सरावपूर्व व्यायाम (वॉर्म अप) करून घेतला जातो. त्यानंतर संपूर्ण व्यायाम करून घेतला जातो.

लाठी फिरवण्यात पारंगत झाल्यावर तलवारबाजी, भालाफेक, दांडपट्टा चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं. या सर्व खेळांचे नियमही ठरलेले असतात. त्यामुळे गर्दीतही अचूकपणे हे खेळ कसे खेळायचे याचा सराव करून घेतला जातो.

मनगट घट्ट आणि पायात बळ असेल तर शत्रूवर वारही करता येतो आणि समोरून येणारा वार चुकवता येतो.

प्रशिक्षणाचं स्वरूप

मुलांसाठी पांढऱया रंगाचा सरदारी पोषाख, तर  मुलींसाठी नऊवारी साडी असा तालमीचा पोषाख असतो. शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमावेळी असा पोषाख केला जातो.

प्रत्येक खेळाची कालमर्यादा ठरवली जाते. एका हाताने, नंतर दोन हातांनी लाठी फिरवणे, लाठीची मशाल करून फिरवणे हे प्रकार आत्मसात केल्यावर तलवारबाजी आणि इतर प्रशिक्षण दिलं जातं.

सुट्टीच्या दिवसांमध्ये काही आखाडय़ांमार्फत शिबिरं भरवली जातात. यामध्ये नवीन मुलंही प्रशिक्षण घेऊ शकतात.

तालमीत शिकवले जाणारे मर्दानी खेळ

दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे, लाठीकाठी, दांडपट्टय़ाने लिंबू कापणे, असे खेळ मुलींना शिकवले जातात. शीतल वाघल-देसाई या मुलीने वयाच्या चौथ्या वर्षापासून ही खेळाची कला आत्मसात केली आहे. आता लग्नानंतर ती तिच्या गावातील मुलींना प्रशिक्षण देते. यातून शारीरिक सुदृढता आणि एकाग्रता साधली जाते.