
सामना प्रतिनिधी । सटाणा
शैक्षणिक व नोकरीसाठी अर्ज भरताना ऑनलाइन लोकेशनला कोळीपाडा गाव येत नाही. त्यामुळे गावातील शासनाच्या डिजिटल धोरणानुसार ग्रामस्थांना सातबारा उतारे तर विद्यार्थ्यांना शैक्षणीक दाखले मिळत नाही. ऑनलाइन अर्ज भरता येत नसल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे भवितव्य अंधारात आहे. तसेच विविध शासकीय योजनांपासून गावाला वंचित राहावे लागत असल्याने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.
कोळीपाडा ग्रामस्थांनी ग्रामसभेत या विषयासंदर्भात ठराव केलेला आहे. ग्रामस्थांनी आज बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले व गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ठरावाची प्रत व निवेदन दिले. निवेदनात, 1967 मध्ये कोळीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत अमरावतीपाडा, कोळीपाडा व दोधेश्वर या तीन गावांची एकित्रत ग्रुप ग्रामपंचायत आहे. कोळीपाडय़ाची लोकसंख्या अडीच हजारांहून अधिक आहे. कोळीपाडा व दोधेश्वर गावातील शंभर टक्के ग्रामस्थ कोळी, महादेव व भिल्ल या अनुसूचित जमातीचे आहेत. मात्र कोळीपाडा हे गाव महसुली नसल्याने कोणतेही ऑनलाइन काम करता येत नाही.
ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून विकास करणेही जिकरीचे झाले आहे. कोळीपाडा गावाचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यास ग्रामस्थांना कामकाजाच्या दृष्टीने सोईचे होईल. याबाबत तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर सरपंच सखाराम जाधव, उपसरपंच भाऊसाहेब पानसे, ग्रामसेवक नीता देवरे, अर्जुन गातवे, पंडित गातवे, खुशाल गातवे, राधेशाम घोडे,नानाजी गातवे, भारत गातवे, शिवाजी जाधव, बापू येडे, आण्णा घुटे, रतन जाधव, पंकज भांगे, भिका भांगे, शांताराम भोईर, बाळू येडे, अंकुश लव्हारे,संतोष गातवे, विठोबा गातवे, भगवान भांगे, संदीप अहिरे, रोशन भांगे, बाळू सोनवणे, मोहन सोनवणे आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
सुशिक्षित तरुणांचे भवितव्य अंधारात
शासनाच्या धोरणानुसार शैक्षणकि व नोकरीसाठी अर्ज दाखल भरताना ऑनलाइन लोकेशनला कोळीपाडा गाव येत नाही. त्यामुळे शेतकरी ग्रामस्थांना सातबारे उतारे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले मिळत नाहीत. नोकरीसाठी अर्ज भरता येत नसल्याने गावातील अनेक होतकरू सुशिक्षित तरुणांचे भवितव्य अंधारात आहे.

































































