
सामना ऑनलाईन। कोलकाता
लोकसभा निवडणुकीदरम्यान पश्चिम बंगालमध्ये सुरू झालेला भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष सुरूच आहे. दोन्ही पक्षांत एकमेकांच्या कार्यालयांवर हल्ले करून ताबा मिळविण्यासाठी स्पर्धा सुरू झाली असून उत्तर 24 परगणा जिह्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीच कुलूप तोडून भाजप कार्यालयाचा ताबा घेतला.
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा सुरू असताना नैहाटीमध्ये सभेला संबोधित केल्यानंतर ममता बॅनर्जी या भाजप कार्यालयात पोहचल्या आणि कुलूप तोडून त्यांनी त्या कार्यालयाचा ताबा घेतला आणि तेथील कमळ चिन्ह हटवले. कार्यालयाच्या भगव्या भिंतीवर काळ्या रंगाने तृणमूल काँग्रेस आणि स्वत:पक्षाचे चिन्ह त्या ठिकाणी रेखाटले. भाजपच्या ज्या कार्यालयाचा ताबा घेतला ते कार्यालय पूर्वी तृणमूल काँग्रेसचेच होते. भाजपचे नवनिर्वाचित खासदार अर्जुन सिंह त्यावर अनधिकृतपणे कब्जा केला होता, असा दावा त्यांनी केला आहे.
आसनसोल येथील भाजप खासदार केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी हे एक अनुभवी नेतृत्व असून त्यांचे असे वागणे हे खूपच संतापजनक आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्यांना आराम करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला. आसनसोल लोकसभा क्षेत्रातून ममतादीदींना गेट वेल सून अशा आशयाची कार्डं पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जय श्रीरामवरून ममतांना घेरण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगालमध्ये जय श्रीरामवरूनही रणकंदन माजले असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरण्याचा प्रयत्न भाजपने चालविला आहे. जय श्रीराम नाऱयाला आपला आक्षेप नाही, पण भाजप त्याचा राजकीय फायदा उठवत आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

























































