
कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू असून हे काम मार्च 2021 पर्यंत मार्गी लागणार असल्याने कोकणचा प्रवास नवीन वर्षात वेगवान होणार आहे. ठोकूर ते बिजूर या 100 कि.मी.च्या मार्गाचे काम पूर्ण झाले असून त्यावर विद्युत इंजिनाद्वारे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांच्या उपस्थितीत नुकतीच यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. सध्या काही मोजक्या टप्प्यात विद्युतीकरण पूर्ण झाले असले तरी वर्षभरात हे काम संपणार असून कोकण मार्गावरील गाडय़ांच्या वेगात वाढ होणार आहे. जी मत्स्यगंधा एक्स्प्रेस मंगळुरू गाठण्यासाठी 16 तास घेते तिला भविष्यात 8 ते 10 तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सप्टेंबर 2017 पासून सुरू करण्यात आले आहे. 1,100 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत सुरू आहे. मध्य रेल्वेची हद्द रोह्यापर्यंत असून त्यानंतर कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. कोकण रेल्वेच्या रोह्यापासून ते ठोकूरपर्यंतच्या रेल्वे मार्गाचे दोन टप्प्यांत विभागणी करून हे विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रोहा ते वेरणा आणि वेरणा ते ठोकूर अशा टप्प्यांत हे विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. रोहा ते वेरणा सेक्शनचे काम फरीदाबादच्या लार्सन ऍण्ड टुब्रोला तर वेरणा ते ठोकूर सेक्शनचे काम नोएडाच्या एसटीएस-केपीटीएल कंपनीला देण्यात आले आहे. हे काम उत्तर दिशेकडून रोह्यापासून तर दक्षिण दिशेचे टोक ठोकूरपासून एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे.
आतापर्यंत 105 कि.मी.च्या ट्रकचे विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर उर्वरित ट्रकचे विद्युतीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. बिजूर आणि वेरणा 200 कि.मी. भागाचे विद्युतीकरण प्रगतिपथावर असल्याचे सूत्रांकडून समजते.
गाडय़ांचा वेग आणि संख्या वाढणार
या विद्युतीकरणाचा भरपूर फायदा कोकणच्या प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे गाडय़ांच्या वेगात वाढ होऊन गाडय़ांची संख्या वाढण्यातही मदत होणार आहे. सध्या दर ताशी 45 ते 50 कि. मी. वेग असणाऱया गाडय़ांचा वेग विद्युतीकरणानंतर दर ताशी 80 ते 100 कि. मी. करणे शक्य होणार आहे.





























































