
आपल्या अभिनयाने छोटा आणि मोठा पडदा गाजवणारी अभिनेत्री स्पृहा जोशी पर्यावरणाबाबतदेखील जागरूक असते. लोकांना सेंद्रिय भाजीपाल्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी नुकतीच ती नाशिकमधील एका खेडेगावातील द्राक्षांच्या मळ्यात पोहोचली. सेंद्रिय भाजीपाला आणि रसायनविरहित द्राक्षांची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी तिने हा खास दौरा केला. या दौऱयाचे व्हिडीयोज तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आपल्याला दोनच प्रकारचे द्राक्ष माहीत असतात. पण ते पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर झालाय का? रंग गडद आणि चव गोड होण्यासाठी विशिष्ट औषधी तर वापरली नाहीत ना? निर्यातीच्या दर्जाची द्राक्षं काही वेगळ्या प्रकारची असतात का, ती आपल्या बाजारपेठेत उपलब्ध होतात का, त्याची निर्मिती आणि विक्री प्रक्रिया कशी असते या सर्व प्रश्नांची उत्तरे तिने जाणून घेतली. बोराळे या खेडेगावातील द्राक्षांच्या बागेत जाऊन उमेश राठी, महेश भुतडा आणि कृषीतज्ञ आणि ग्रीनफिल्ड अॅग्रो अॅपचे अमोल गोऱहे यांच्याशी संवाद साधला. सेंद्रिय भाजीपाला पिकवण्याची अन् विक्रीची पद्धत यांसह शेतीतील विविध प्रयोगांची माहिती तिने घेतली.

























































