गुप्तधन सापडून देणाऱ्या मजुराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खोदकाम करताना गुप्तधन सापडून देणाऱया मजुराने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री बेलापूर गावात घडली आहे. सुनील गायकवाड असे मृत मजुराचे नाव आहे.

बेलापूर गावातील खटोड यांच्या घरी जुलै महिन्यात संरक्षक भिंतीच्या कामासाठी सुनील गायकवाड हा मजूर खोदकाम करीत होता. खोदकाम सुरू असताना मजुरांना एक तांब्याचा हंडा सापडला. या हंडय़ात सोन्या-चांदीची नाणी सापडली होती. नंतर या गुप्तधनाची विधिवत पूजा करण्यात आली. मात्र, गुप्तधनाच्या वाटणीवरून वाद सुरू झाले. त्यातून गुप्तधनाची बातमी वाऱयासारखी पसरली.

दरम्यान, बेलापुरातील लोकांनी गुप्तधनाची विल्हेवाट लावल्याची माहिती सुनीलने दिली होती. त्या दिवसापासून सुनील घाबरून राहत होता. रविवारी त्याची पत्नी गावाला गेली असता, सुनीलने आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बेलापूर पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. दरम्यान, गुप्तधन प्रकरणामुळेच सुनीलने आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे.