
लांजा शहरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या खोकेधारकांना लांजा नगरपंचायतीने अचानक नोटीस पाठवून खोके उठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या सर्व व्यावसायिकांनी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. आमदार राजन साळवी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनी करून व्यावसायिकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवण्याबाबत मागणी केली आणि ही कारवाई न थांबल्यास शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा आमदार साळवी यांनी दिला.
लांजा शहरातील शाळा क्र.5 लगतच्या व्यावसायिकांचे खोके उठवण्याबाबत नगरपरिषदेने नोटीस दिली आहे. या सर्व खोकेधारकांनी व्यवसायासाठी विविध योजनांतर्गत कर्ज काढलेली आहेत. तसेच नगरपंचायतीचा कर नियमित भरत आहेत. अशावेळी लांजा नगरपंचायतीने अचानक नोटीस देऊन व्यावसायिकांचे खोके उठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर या सर्व खोकेधारकांनी सत्ताधाऱ्यांची भेट घेतली. पण त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य झाले नाही. त्यानंतर या व्यावसायिकांनी शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांची भेट घेतली आणि अन्यायकारक कारवाईबाबत व्यथा मांडली. व्यावसायिकांची व्यथा जाणून घेतल्यानंतर आमदार राजन साळवी यांनी लांजा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कारवाई थांबवण्याची मागणी केली. तसेच शाळा क्र. 5 लगत असलेल्या सर्व खोकेधारक व्यावसायिकांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे. अन्यायकारक कारवाई न थांबल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.































































