‘नेताजीं’ना अखेरचा निरोप, मुलायमसिंह यादव यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना आज सैफई येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या ‘नेताजीं’च्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. देशातील विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी यावेळी अंत्यदर्शन घेतले.

मुलायमसिंह यादव यांचे सोमवारी गुरूग्राम येथील मेदांता रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. सायंकाळी उत्तर प्रदेशातील मूळ गाव सैफई येथे पार्थिव आणण्यात आले. यादव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सपा कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. आज सैफई येथे अंत्यसंस्कार झाले. पुत्र अखिलेश यांनी मुलायमसिंह यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.

मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

मुलायमसिंह यादव हे सर्व पक्षांत लोकप्रिय होते. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी देशातील प्रमुख पक्षांचे नेते, विविध राज्यांचे मुख्यमंत्री सैफई येथे उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, तेलगूदेसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माकप नेते प्रकाश कारत, सीताराम येचुरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, आपचे नेते संजय सिंह, खासदार जया बच्चन, अभिनेते अभिषेक बच्चन, उद्योगपती अनिल अंबानी यांनी अंत्यदर्शन घेतले.