
चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली आणि जामिनावर सुटका होताच पुन्हा चोरी करणे महागात पडले. चोरलेल्या मोटारसायकलसह पोलिसांनी आरोपीला पुन्हा पकडल्याची घटना लातुरात घडली आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस ठाणे एमआयडीसी येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी नुकताच चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृह लातूर येथून जामिनावर सुटलेला सराईत गुन्हेगार सुमित दगडू गर्गेवाड हा असण्याची शक्यता आहे. सुमित दगडू दर्गेवाड (25, रा. मळवटी रोड सिद्धेश्वर नगर लातूर) यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्यांनी पोलीस ठाणे एमआयडीसीच्या हद्दीतील श्याम नगर येथून मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. त्यावरून अधिक तपास करून नमूद पथकाने त्याच्याकडून चोरलेली 1 लाख 10 हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल जप्त केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
चोरीच्या गुन्ह्यातून जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटताच दुसऱ्याच दिवशी पुन्हा चोरीचा गुन्हा करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करण्यात आली. यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्कृष्टरित्या तपास करून मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल केली. मोटारसायकल जप्त करून आरोपीला अटक केली. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अंमलदार बेल्लाळे, प्रताप वांगे, अर्जुन राजपूत, गोविंद चामे यांनी पार पाडली.

























































