‘मोक्का’त दीड वर्षांपासून फरार असलेला शेवाळे टोळीचा म्होरक्या जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मोक्का’ कायद्यांतर्गत कारवाईनंतर मागील दीड वर्षांपासून फरार असलेला आणि कोंढव्यातील शेवाळे टोळीचा प्रमुख असलेल्या म्होरक्याला कोंढवा पोलिसांनी नगर जिल्ह्यातील चांदा गावातून बेड्या ठोकल्या. राहत्या घरातून झोपेत असतानाच पोलिसांनी त्याच्या मूसक्या आवळल्या. वृषभ रामदास शेवाळे (24, रा. शेवाळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

दीड वर्षांपुर्वी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळे टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर टोळीप्रमुख वृषभ शेवाळे हा फरार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी होत होता. या दरम्यान आरोपी शेवाळे हा नगर जिल्ह्यातील चांदा गाव येथे असल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे अंमलदार निलेश देसाई, ज्योतीबा पवार यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून नगर जिल्ह्यातील चांदा येथील घरातून शेवाळेला ताब्यात घेतले. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार सतीश चव्हाण, गोरखनाथ चिनके, सुजित मदन, ज्ञानेश्वर भोसले, लक्ष्मण होळकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.