मंत्रिपद कसे मिळवतात हे माझ्याकडून शिका- रामदास आठवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-athawale

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

ना मोदींना भेटलो ना शहांना तरी आपल्याला मंत्रिपद मिळाले, मंत्रिपद कसे मिळवावे हे आपल्याकडून शिका असे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आठवले म्हणाले की, “मंत्रिपदासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली नाही, तसेच भाजपध्यक्ष अमित शहा यांनाही आपण मंत्रिपदासाठी भेटलो नाही. तरी आपली वर्णी मंत्रिपदी लागली. मंत्रिपद कसे मिळवावे हे लोकांनी आपल्याकडून शिकावे” असे आठवले म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला एकतरी जागा लढवायला मिळावी अशी आपली इच्छा होती परंतु भाजपने दिली नाही. असे असले तरी आपले मंत्रिपद कायम राहणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्पष्टवक्ते आठवले

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी आठवले ओळखले जाते. यापूर्वी ज्याची सत्ता असेल त्यासोबत आपण असू असे आठवले म्हणाले होते. तसेच जेव्हा पेट्रोलचे दर वाढले होते तेव्हा ‘मी मंत्रि आहे मला पेट्रोल फुकत मिळते’ असे आठवले म्हणाले होते. तरुणांनी सैन्यात भरती व्हावं तिथे जेवण चांगले मिळतं असेही आठवले एकदा म्हणाले होते.