रावणरुपी दुष्काळाविरोधात एकत्र येऊन लढा देऊ, आदित्य ठाकरेंचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने ।  बुलढाणा

आज दुष्काळाचा रावण तुमच्या समोर उभा आहे, या रावणरुपी दुष्काळाशी आपण सर्व एकत्र येवून लढा देऊ. शिवसेना तुमच्या सोबत आहे. त्यामुळे रावणाला मारण्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण पुरेसे आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो आत्महत्या करु नका, एवढेच हात जोडून सांगतो. व तुम्ही तुमच्या संकटाच्या काळात हाक द्या, शिवसेना तुमच्या घरी येऊन मदत करेल असे कृतीशील आश्वासन शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेहकर येथे दिले.

अझान सुरू झाली म्हणून आदित्य ठाकरेंनी थांबवले भाषण

मेहकर येथे शिवसेनेतर्फे २५० आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटूंबीयांना मदत करण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मेहकरमध्ये आले होते. त्यावेळी स्वातंत्र्य मैदानावर शेतकरी कुटूंबाना मदत केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “आजचा कार्यक्रम हा अभिमानास्पद नाही, मदत करायला लागणे ही काही अभिमानाची गोष्ट नसते. पण तरीही मला युवासैनिक असल्याचा अभिमान आहे. कारण आमच्या वयोगटातील मुला मुलांचे सगळ्यांच लक्ष शाळा कालेज, ट्युशनमध्ये असते किंवा मजा करण्यात असते. आणि या वयोगटात असताना सर्व मुलांनी, युवासैनिकांनी महाराष्ट्राच्या मदतीला धावून जाणे ही मोठी गोष्ट आहे हे युवासेना करत आहे. आता खासदार जाधव साहेब बोलत असताना मी ऐकत होतो की, शिवसेना कुठे कुठे मदतीला धावून गेली आहे. काही आठवणीसाठी त्यांनी सांगितल्या, माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे २९ वर्षापूर्वी याच दिवशी याच बुलढाणा जिल्ह्यात येवून त्यांनी मदत केली होती. हा योगायोग आहे का हे मला माहित नाही. परंतु काही दिवस आम्ही हा कार्यक्रम ठरवण्याचा प्रयत्न करीत होतो. आणि आज ते घडून आले. परंतु खरंतर ही जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती आपण सर्वांनी विचार करण्यासारखी आहे. अर्थात परिस्थिती बघायची झाल्यास एक राजकीय परिस्थिती आहे आणि दुसर्‍या बाजूला सामाजिक परिस्थिती आहे. जी खरोबर आपण बघतोय आजूबाजुला बघतो आहे. राजकीय परिस्थिती बघायची झाल्यास काही महिन्यापूर्वी सरकारने कर्जमाफी जाहीर केली. झाली का तुमच्याकडे कर्जमाफी? मिळाली का तुम्हाला मदत? असा थेट प्रश्न उपस्थितांना केला असता जनतेतून नाही नाही असा सूर उमटला. परंतु ‘अच्छे दिन आनेवाले है’ हे आपण ऐकतो, असे जुमले चालूच आहे. पण ही टीका मी करणार नाही, राजकीय भाष्य मला करायचे नाही. कारण शिवसेनेसाठी समाजकारण हेच सर्वात महत्वाच आहे. आणि जिथे जिथे शिवसेनेने राजकारण केले असेल, सत्ता मिळवली असेल, जिथे जिथे आमदार असतील, खासदार असतील, तिथे शिवसेनेने राजकारण म्हणून राजकारण केले नाही, तर लोकांची सेवा करण्यासाठी शिवसेना राजकारण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले “मला आठवतयं मी २२ वर्षाचा असताना २०१२ ला आमच्या मुंबईपासून २ ते अडीच तास अंतरावर ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा येथे दुष्काळ होता, तेव्हा देखील ७५ गावांना १ लाख ७५ हजार लोकांना पाणी, अन्नधान्य व कपडे दिले. २०१३ मध्ये मराठवाड्यात उद्धव साहेबांसोबत फिरलो, ४०० गावांना पाणी दिले, चारा छावण्या उघडल्या, घरोघरी जाऊन मदत केली, २०१४ च्या निवडणुका नुकत्याच झालेल्या. त्यावेळी ऑक्टोबरचा महिना होता. तेव्हा शिवसेना सरकारमध्ये बसली नव्हती, तेव्हा देखील सरकार होईल, मंत्रीपदे मिळतील, न मिळतील हा विचार बाजूला सोडून उद्धव साहेब मराठवाडा व महाराष्ट्रात फिरले व मदत केली. २००७ सालात मी १७ वर्षाचा होतो, तेव्हा कर्जमुक्तीची हाक शिवसेनेने नागपूर मध्ये दिली. या सर्व आठवणी आहेतच. बीड मध्ये शिवसेनेतर्फे सामुहिक विवाह सोहळे घेतले. अर्थात या सामुहिक विवाह सोहळ्यात सर्व जाती धर्माची जोडपी होती. त्यांच्या धर्माप्रमाणे लग्न लावून देऊन घरातील सर्वच वस्तू, सुट-बुट, अन्नधान्य शिवसेनेने दिले. मी शिवसेनेचे मोजमाप करण्यासाठी हे बोलत नाही, तुम्हाला असे वाटेल हा २८ वर्षाचा तरुण मुलगा, याला काय माहित आहे म्हणून मी हे सांगत आहे. दुष्काळ मी फिरुन बघितला आहे. गावागावात सुकलेली पिकं, आत्महत्याग्रस्त कुटूंबाला जाऊन भेटलो आहे. हे सर्व करत असताना मला एकच आठवते की दुष्काळ मार्च एप्रिल महिन्यात सुरु व्हायचा परंतु कितीतरी वर्षानंतर यावर्षी ऑक्टोबर संपत नाही, नोव्हेंबर सुरु होतो, पावसाला दहा महिने बाकी आहे आणि आपणाला दुष्काळाच्या परिस्थितीशी सामोरे जावे लागते आहे. एक भीषण परिस्थिती आपल्यासमोर आहे. दुष्काळाचा मोठा रावण आपल्यासमोर उभा राहिला आहे आणि त्या रावणासमोर आपण हतबल झालो आहोत, सर्व चिंतेत पडलो आहोत. आपण काय करु शकतो, असा प्रश्न आपल्याला पडला आहे. मी आपणा सर्वांना एवढेच सांगायला आलो आहे की येथे जे शेतकरी बंधु-भगिणी बसले आहे, काका-आजोबा त्यामध्ये आहे, त्यांना मी हात जोडून एवढीच विनंती करतो की, कृपा करुन आत्महत्या करु नका. आत्महत्येचा विचार करु नका.” जर तुम्हाला मदतीची हाक मारायची असेल तर शिवसेनेला मदतीची हाक मारा आम्ही तुमच्या गावी येऊन मदत करु. कारण आत्महत्या करुन यातून काही मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच “काही शेतकरी मुंबईला शिवसेना भवनाला येतात त्यांनी जी मदत मागितली ती शिवसेना करतच असते. आत्महत्याग्रस्त कुटूंबाला सुद्धा शिवसेनेने वेळेवर मदत केली आहे. त्यामुळे आत्महत्येचा विचार सोडून द्या. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला रडायचे नाही तर लढायचे आहे ही जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीप्रमाणे आपण एकत्र येऊन या दुष्काळाशी लढूया. शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेवून आपल्या समोर जो दुष्काळरुपी रावण उभा असेल त्या रावणाला मारण्यासाठी शिवसेनेचा धनुष्यबाण पुरेसा आहे. शिवसेनेसोबत राहा हे सांगतानाच राजकीय दृष्टीने तुम्ही कुठेही असेल तरी चालेल असे सांगून त्यांनी मुंबईत सहा महिन्यापूर्वी लाल झेंड्याचा कम्युनिस्ट पक्षाचा शेतकरी मोर्चा आला असता उद्धव साहेबांनी त्यांच्या मदतीसाठी मला पाठविले होते. त्यावेळी साहेब म्हणाले होते झेंडा, पक्ष कुठलाही असलातरी त्याचे रक्त लाल आहे. जातपात धर्म पक्षाचा भेदभाव शिवसेनेजवळ नाही. त्यामुळे शिवसेना संकटाकाळी धावून जाते. हे अनेकवेळा सिद्ध झाले असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, युवासेना कोअर कमिटी सदस्य सिद्धेश कदम व पवन जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुखद्वय जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, युवासेना जिल्हा अधिकारी ऋषीकेश जाधव, यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.