
हिवाळ्यात शरीराला उब देणारा…उष्णता वाढवणारा…आहार घेणे आवश्यक आहे. याकरिता या दिवसांत आहारात उष्ण पदार्थ आणि खाण्यापिण्याची जास्त काळजी घ्यावी लागते. थंडीत शरीराला अनेक पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. यामुळे शरीर निरोगी…आरोग्यदायी राहायला मदत होते. काजू, बदाम असा विविध प्रकारचा सुका मेवा खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त राहतेच शिवाय जिभेची चवही वाढते. जाणून घेऊया, हिवाळ्यात कोणत्या पाच प्रकारच्या सुकामेव्याचा आहारात समावेश करावा.
बदाम
सुकामेव्याचा राजा असे बदामाला म्हटले जाते. बदामात फॅटी अॅसिड, प्रथिने, फायबर, झिंक, जीवनसत्त्व ई जीवनसत्त्व ई मुबलक प्रमाणात असते. यासोबतच बदामाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण आणि हिमोग्लोबिनची पातळीही सुधारते. यासोबतच बदामाने कोलेस्ट्रॉलची पातळीही चांगली राहते. भूकेच्या वेळी बदाम खाल्ल्यास शरीरातील जीवनसत्त्वांची कमतरता भरून निघते तसेच, बदाम उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात बदाम खाणे फायदेशीर ठरते.
काजू
काजू आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींसाठी खूप गुणकारी असल्याचे सांगितले जाते. काजू शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. काजूच्या सेवनाने उच्च रक्तदाबाची पातळीही योग्य ठेवता येते. मायग्रेनच्या दुखण्यावरही काजू गुणकारी आहे. काजूमध्ये व्हिटॅमिन ईदेखील भरपूर असते. तसेच ते तुमच्या त्वचेसाठी खूप चांगले आहे.
अक्रोड
हिवाळ्यात अक्रोड खाणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते, जे उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्यात खूप मदत करतात. अक्रोडचे सेवन त्वचा आणि केसांसाठीदेखील खूप चांगले आहे.
अंजीर
अंजीर हे असे ड्रायफ्रूट आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर उपलब्ध असतात. अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, बी1, बी12, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, पोटॅशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अंजीर खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. हिवाळ्यात याचे सेवन करणे खूप चांगले आहे.
पिस्ता
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट घटक पिस्त्यात आढळतात. पिस्त्याचे सेवन केल्याने त्वचेचे हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण होते. यामुळे त्वचा तरुण राहते.




























































