बीएफआयच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी लोगो, जर्सीचे अनावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी बास्केटबॉलला नव्या उंचीवर नेण्याच्या प्रक्रियेची माहिती देणाऱ्या बास्केटबॉलसाठीच्या एका महत्त्वाच्या टप्प्याचे मंगळवारी कधीही न झोपणारे शहर मुंबई साक्षीदार झाले. बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, कोची आणि मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे सहा शहरी संघ आयएनबीएल सिझन 2022मध्ये, हिंदुस्थानी बास्केटबॉल महासंघाच्या (बीएफआय) पहिल्यावहिल्या राष्ट्रीय स्पर्धांमधील तीन प्राथमिक फेऱयांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे राहतील.

आयएनबीएल हंगामाची पहिली फेरी 16 ते 20 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कोची येथे खेळवली जाईल आणि त्यानंतर सहा दिवसांनी दुसरी फेरी 26 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत जयपूर येथे होईल. तिसरी फेरी पुण्यात 7 ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत होणार आहे. 11 ते 15 जानेवारी या कालावधीत बंगळुरू येथे विजयासाठीचे सामने होणार आहेत.

आयएनबीएल लीगच्या लोगोंच्या अनावरणाच्या वेळी अरविंद अरुमुगम (बेंगळुरू किंग्स), एम. अरविंद कुमार (चेन्नई हीट), अरविंदर सिंग काहलॉन (चंदीगड वॉरियर्स), दिग्विजय सिंग (दिल्ली ड्रिबलर्स), सेजिन मॅथ्यू (कोची टायगर्स) आणि सिद्धांत शिंदे (मुंबई टायटन्स) यांनी संघांचे प्रतिनिधित्व केले. लोगोचे अनावरण बॉलिवूड अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा याच्या हस्ते झाले. याप्रसंगी बीएफआयचे अध्यक्ष डॉ. के. गोविंदराज, बीएफआयचे सेक्रेटरी जनरल चंदर मुखी शर्मा यांनी हिंदुस्थानी बास्केटबॉलला जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही दिले.