लोकसभा निवडणुकीत नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आम्हाला कांद्याने रडवले. मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन आणि कापसाने त्रास दिला आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता, पण चारशे पारच्या आकडय़ामुळे गडबड झाल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
रब्बी पिकांच्या आधारभूत किमती निश्चित करण्यासाठी पश्चिम हिंदुस्थानातील राज्याच्या प्रतिनिधींची बैठक मुंबईत आयोजित केली होती. त्यावेळी बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशाची कारणे सांगितली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता, पण एनडीएची गाडी 300 पारही होऊ शकली नाही. अनेक राज्यांमध्ये त्यांना मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातही महायुतीला यश मिळाले नाही. या सर्वाची कबुली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात आम्हाला कांद्याने अक्षरशः रडवले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आम्हाला फार त्रास झाला. नाशिकसह आसपासच्या भागात आम्हाला कांद्याने त्रास दिला, तर मराठवाडा आणि विदर्भात आम्हाला सोयाबीन आणि कपाशीने (कापूस) त्रास दिला. दुधासाठीदेखील आमच्या सरकारने काम केले. सोयाबीन, कपाशीसाठी आम्ही साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, मात्र निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाली.