केंद्र सरकारच्या आदेशानुसार नीलम राणे, आमदार नीतेश राणे यांना लूकआऊट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीएचएफएल कंपनीकडून घेतलेले कोटय़वधींचे कर्ज थकविल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नीतेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दुजोरा दिला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी ही लूकआऊट नोटीस बजावली असल्याचे गृह मंत्र्यांनी स्पष्ट केले.

पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

कर्ज घेऊन परतफेड न केल्या प्रकरणी दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटींचे कर्ज घेतले होते, तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या पंपनीने डीएचएफएलकडून 40 कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचीदेखील 34 कोटींपर्यंतीची थकबाकी आहे. याबाबत डीएचएफएलने तक्रार दाखल केली होती. पुणे पोलिसांनी 3 सप्टेंबर रोजी लूकआऊट नोटीस पाठवली आहे. हे पत्र मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनालादेखील पाठवले आहे.

काय म्हणाले गृह मंत्री वळसे-पाटील

थकित कर्ज प्रकरणी डीएचएफएल कंपनीने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्य सरकारने यासंदर्भात गृह विभागाला सूचित केल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुणे पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली, अशी माहिती राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.