बनावट हेडफोन विकून फसवणूक, फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅपल कंपनीचे बनावट हेडसेट विकून नंतर रक्कम परत न दिल्याने फ्लिपकार्टच्या प्रमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश लखनौ न्यायालयाने दिले आहेत. लखनौ येथील एका वकिलानेच हा खटला दाखल केला होता.

या वकिलाचं नाव अभिमन्यू सिंह असं आहे. सिंह यांनी फ्लिपकार्टमधून ऑगस्ट महिन्यात 10 तारखेला 17,489 रुपयांना अॅपलचे ब्लूटुथ एअरपॉड्स घेतले. ऑनलाईन पैसे भरल्यानंतर 12 तारखेला त्यांना डिलिव्हरी मिळाली. ते पॉड्स आणि त्याचं पॅकेजिंग पाहून सिंह यांना संशय आला. तेव्हा त्यांनी अॅपलच्या अधिकृत सेवा केंद्रात धाव घेतली. तेव्हा त्यांना मिळालेले एअरपॉड्स हे नकली असल्याचं त्यांना समजलं.

मग सिंह यांनी फ्लिपकार्टच्या ग्राहक तक्रार विभागात संपर्क साधला आणि आपल्याला नकली एअरपॉड्स मिळाल्याचं सांगितलं आणि रिफंड देण्याची विनंती केली. पण, 21 ऑगस्ट रोजी त्यांची विनंती फेटाळून लावण्यात आली. त्यानंतर सिंह यांनी लखनौ पोलिसात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण, जेव्ह त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले तेव्हा त्यांनी लखनौच्या न्यायालयात याचिका दाखल केली.

या याचिकेत त्यांनी फ्लिपकार्ट, त्याचे प्रबंध निदेशक, कल्याण कृष्णमूर्ती यांच्यासह विक्रेते, हाईडटेल रिटेल सेल्स आणि ल्युमनिरी लाईफस्टाईल विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्याची मागणी केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने गोमती नगर एक्स्टेन्शन पोलीस स्टेशन, लखनौ स्टेशन हाऊस ऑफिसर यांना फसवणुकीची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.