गायीच्या पोटातून काढले 65 किलो प्लास्टिक, मदुराई येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मदुराई येथील सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी नुकतेच एका सहा वर्षाच्या गायीच्या पोटातून 65 किलो प्लास्टिक आणि धातूचा कचरा काढला आहे. त्यामुळे पशुवैद्यकांनी पालिका अधिकाऱ्यांना रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना कचरा खाण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

स्थानिक व्यक्ती परमेश्वरन यांनी नुकतेच गेल्या महिन्यात आपल्या गायीला रुग्णालयात आणले होते. त्यांची गाय अनेक दिवसांपासून पाणी पीत नव्हती तसेच काही खात देखील नव्हती. दरम्यान तिने नुकताच एका बछड्याला जन्म दिला होता. चाचणी केल्यानंतर डॉक्टरांना कळाले की या गायीचे पोट प्लास्टिक आणि धातूच्या कचऱ्याने भरले आहे. त्यामुळे गायीला भूक देखील लागत नव्हती. अखेर मुख्य पशुवैद्य डॉ. वैरासामी व इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गायीच्या पोटातून प्लास्टिक काढले.

याबद्दल डॉ वैरासामी म्हणाले, ‘गायीच्या पोटात सर्व कचरा गुंडाळला गेला होता आणि त्यामुळे पोटात कचऱ्याचा एक मोठा गोळा बनला होता, आम्ही तीन तासात पोटातील सर्व कचरा काढून टाकला. सुमारे 65 किलो कचऱ्यामध्ये 90% प्लास्टिक होता. ज्यामध्ये पिशव्या आणि कचरा तर काही धातूच्या वस्तू जसे की खिळे आणि नाणी बाहेर काढण्यात आले. 72 तासांच्या देखरेखीनंतर गाय पुन्हा एकदा खायला लागली आहे.’