एकाही पात्र मतदाराचे नाव वगळू देणार नाही, महाविकास आघाडीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेच्या (एसआयआर) मुद्दय़ावरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात पुढच्या महिन्यात एसआयआर मोहीम राबवली जाणार आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची आज मंत्रालयात भेट घेतली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत घडले ते या एसआयआर मोहिमेद्वारे महाराष्ट्रात घडू नये, एकाही पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये यासाठी राजकीय पक्षांबरोबर सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज आहे, असे या भेटीनंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांच्याशी चर्चा केल्यानंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मंत्रालयासमोरील शिवालय येथे झाली. त्या पत्रकार परिषदेला आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी संबोधित केले. मतदार यादीमधून मतदार वगळण्याचे प्रयत्न एसआयआरच्या माध्यमातून सुरू आहेत त्याबद्दल महाविकास आघाडीने आपल्या शंका चोक्कलिंगम यांच्याकडे मांडल्या. एसआयआरबाबत 36 मुद्दे निवडणूक आयोगासमोर निवेदनाद्वारे उपस्थित केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

चोक्कलिंगम यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून महाविकास आघाडीने मांडलेल्या सूचनांवर निवडणूक आयोगाकडून अंमलबजावणी होईल अशी आशा आहे. तरीदेखील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यावर लक्ष ठेवून आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. देशात लोकशाही राहिलेली नाही आणि निवडणूक आयोग निष्पक्ष राहिलेला नाही, निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून काम करतोय, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.

केंद्रीय निवडणूक आयुक्तांशीही चर्चा करणार

एसआयआरबाबत उपस्थित केलेल्या सूचनांमधील काही गोष्टी राज्याच्या हातात नाहीत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयुक्तांशी चर्चा करावी लागणार आहे. महाविकास आघाडीचे खासदार ती चर्चा करतील असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंग यांच्याबरोबरच्या भेटीवेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे, खासदार धैर्यशील मोहीते, शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे व अनिल परब, आमदार वरुण सरदेसाई, समाजवादी पक्षाचे रईस शेख, काँग्रेस आमदार सतेज पाटील, उल्का महाजन आदी उपस्थित होते.

दुबार मतदारांची नावे देऊनही कारवाई नाही

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर मतदार यादीतील बोगस व दुबार मतदारांची नावे महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला दिली होती. त्यात 17 लाख संभाव्य दुबार मतदार होते. एकच नाव फोटोसह सहा-सात वेळा आले होते, मात्र त्यावर निवडणूक आयोगाने काहीच कारवाई केली नाही, असा जोरदार हल्ला आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. एसआयआर मोहिमेत त्या दुबार नावांची शहानिशा करावी. त्यासाठी विशेष सॉफ्टवेअर किंवा एआयचा वापर करावा, असे निवडणूक आयोगाला सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

एसआयआरसंदर्भात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंग यांना भेटले. यावेळी चोक्कलिंग यांना निवेदन देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राजेश टोपे, खासदार धैर्यशील मोहीते, शिवसेना नेते-आमदार अंबादास दानवे व अनिल परब, शिवसेना सचिव-आमदार वरुण सरदेसाई, समाजवादी पक्षाचे रईस शेख, काँग्रेस आमदार सतेज पाटील, उल्का महाजन आदी उपस्थित होते.

वगळलेल्या नावांची यादी द्या – शशिकांत शिंदे

एसआयआर मोहिमेत कोणताही राजकीय हस्तक्षेप नसावा, मतदार यादीतील नावांची पडताळणी करताना वगळल्या जाणाऱ्या नावांची यादी महाविकास आघाडीला देण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. आता पुढील तीन वर्षे तरी राज्यात निवडणुका नाहीत. त्यामुळे एसआयआर प्रक्रिया घाईघाईत न करता मुदत वाढवून द्यावी आणि बीएलओंवर राजकीय दबावाचा वापर न करता निःपक्षपातीपणे काम करू द्यावे, अशी सूचना आयोगाला करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दर आठवडय़ाला आयोगाची भेट घेणार – सचिन सावंत

एसआयआर प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली जावी यासाठी महाविकास आघाडी दक्ष असून यासंदर्भात आता दर आठवडय़ाला निवडणूक आयोगाची भेट घ्यावी लागणार असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी सांगितले. राज्याबरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगाचीही भेट घ्यावी लागेल, असे ते म्हणाले. राज्यात पुनर्विकासाची कामे चालली आहेत. तेथील रहिवासी तसेच वेगवेगळय़ा कारणास्तव राहत्या ठिकाणापासून दूर गेलेल्या मतदारांचे काय करणार असे विचारले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नव्हते, असे ते म्हणाले. एसआयआर भाजपकडून निवडणूक जिंकण्यासाठी शस्त्र म्हणून वापरले जात असल्याचा आरोपही सावंत यांनी केला.