आज बाळासाहेब हवे होते, शरद पवारांकडून आठवणींना उजाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी मांडला. या ठरावाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले. या बैठकीमध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आठवणींना उजाळा दिला. आज बाळासाहेब ठाकरे हवे होते, असे शरद पवार म्हणाले.

आजचा दिवस पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते. आज बाळासाहेब असते तर आम्हाला आणखी आनंद झाला असता, अशा शब्दांत दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. बाळासाहेबांशी माझे व्यक्तिगत पातळीवर सलोख्याचे संबंध होते. बाळासाहेब, जॉर्ज फर्नांडिस आणि मी एकमेकांवर टीका करताना कधीच काटकसर केली नाही. बाळासाहेब माझ्यावर टीका करायचे मग मीही त्याला उत्तर द्यायचो. दिवसा जाहीर सभात एकमेकांचा समाचार घेतला तरी संध्याकाळी मात्र आम्ही एकत्र असायचो, असेही पवार यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक

स्वर्गीय मीनाताई ठाकरे या अगदी आपुलकीने आवडीनिवडीनुसार स्वयंपाक करायच्या. आमच्या मैत्रीत कधीच राजकारण आड आले नाही. राजकारणापलीकडे जाऊन आम्ही वैयक्तिक संबंध जपले. देशात जे मोठे नेते झाले त्यातील बाळासाहेब हे एक होते असे मी म्हणेन. बाळासाहेबांनी लहानातल्या लहान कार्यकर्त्यालाही मोठे केले. मी नेहमी चंद्रकात खैरे यांचे उदाहरण देतो. खैरे यांना 30 ते 35 वर्षे विधीमंडळ आणि संसदेत काम करण्याची संधी मिळाली. खैरे ज्या समाजात जन्मले त्या समाजाची लोकसंख्या जेमतेम दोनतीन हजारांची आहे. त्यांच्यातील कर्तुत्व ओळखून त्यांना संधी देण्याची किमया केवळ बाळासाहेबांसारखाच नेता करू शकला. म्हणूनच बाळासाहेबांचं नेतृत्व अलौकिक ठरतं, असं सांगताना उद्धव हाच वारसा पुढे नेतील, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.