भाजपच्या आमदारकीचा राजीनामा, पण उमेदवारीचा पेच कायम

18
mahadev jankar gives resign as bjp mla

सामना प्रतिनिधी । मुंबई

विधान परिषद निवडणुकीत दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून (रासप) अर्ज भरल्याने त्यांच्यावर सहा वर्षांची बंदी आली असती. हा धोका ओळखून त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला. मात्र त्यांच्या उमेदवारीचा पेच कायम आहे. अतिरिक्त उमेदवार म्हणून जानकर की पृथ्वीराज देशमुख यांचा निर्णय भाजपच्या केंद्रीय समितीकडून घेतला जाणार असल्याने टांगती तलवार कायम आहे.

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱया निवडणुकीत भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येत आहेत. यात भाजपने मंत्री महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर केली तर पृथ्वीराज देशमुख यांनी सहावा उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. दोन वर्षांपूर्वी जानकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे त्यांच्यावर रासपमधून प्रचंड टीका झाली होती. ही चूक परत होऊ नये यासाठी जानकर यांनी भाजपची उमेदवारी नाकारत रासपकडून उमेदवार अर्ज भरला आहे. परंतु भाजपच्या आमदारकीचा राजीनामा न देता रासपचा अर्ज भरल्यास त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार सहा वर्षांची बंदी आली असती. त्यामुळे जानकर यांनी गुरुवारी सकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर रासपचा अर्ज भरला. आज विधान परिषदेत सभापतींनी निवेदन करून जानकरांचा राजीनामा मान्य केला.

पत्रकारांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपच्या केंद्रीय समितीने जानकरांना उमेदवार जाहीर केली होती, पण त्यांनी रासपकडून उमेदवार भरली आहे. त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जानकर यांना रासपकडून निवडून लढवू द्यावी अशी मागणी केंद्रीय समितीकडे केली आहे. विधान परिषदेची निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. जानकरांनी जरी माघार घेतली तरी त्यांच्या मंत्रीपदाला सहा महिने धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप युती टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचेही पाय धरेन
महाराष्ट्रात शिवसेना व भाजपची युती टिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पाय धरण्याचीही माझी तयारी आहे. ही युती टिकवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेनेचे पाय धरायला जाईल, असे दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी आज प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना सांगितले. महादेव जानकर यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळेस जानकर हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या पाया पडले. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महादेव जानकर म्हणाले की, मी नेहमीच रावसाहेब दानवे तसेच नितीन गडकरी यांच्या पाया पडतो. गोपीनाथ मुंडे यांच्याही पाया पडायचो. कारण ही आपली संस्कृती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या