महालक्ष्मी जम्बो कोविड सेंटरमध्ये 205 आयसीयू, 250 कोविड बेड!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेसाठी पालिका आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवत असून महालक्ष्मी रेसकोर्सच्या वाहनतळाच्या जागेवर 455 बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करणार आहे. या ठिकाणी 205 आयसीयू आणि 250 कोरोना बेड सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे दिलासा मिळाला होता. 15 ऑगस्टनंतर दोन डोस घेतलेल्यांसाठी सुरू झालेल्या लोकलसह इतर अनेक निर्बंधही शिथिल केल्याने गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. विशेष म्हणजे लहान मुलेही कोरोनाबाधित होऊ लागल्याने तिसऱया लाटेचे संकेत मिळाल्याने पालिकेने संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये महालक्ष्मी रेसकोर्स येथे 455 खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे. यासाठी पालिका सुमारे 44 कोटी रुपये खर्च करणार आहे.

अशा होणार सुविधा

महालक्ष्मी रेसकोर्स जम्बो कोविड सेंटरचे स्थापत्य आणि इतर सेवासुविधांचे आरेखन, उभारणी, कार्यान्वित करणे, प्रचालन आणि देखभाल अशी कामे कंत्राटदाराला करावी लागणार आहेत. याशिवाय द्रवरूप प्राणवायू पुरवठा, वातानूकुलित यंत्रणा आयसीयू आणि इतर बेडकरिता वैद्यकीय उपकरणे पुरवणे, अग्निसुरक्षा यंत्रणा, अखंड विद्युत पुरवठा अशी कामेही करावी लागणार आहेत. एका महिन्यात हे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे.