
सामना प्रतिनिधी । पुणे
कश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या जवानांच्या पोस्टिंग माहितीची कागदपत्रे जवळ बाळगणाऱ्या एका संशयिताला बिहार दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील खालुंर्बे गावातून जेरबंद केले. न्यायालयात हजर केल्यानंतर एटीएस पथक त्याला घेऊन बिहारला रवाना झाले.
शरियत अन्वर उल्लाहक मंडल (वय 19, मूळ रा.वाजिदपूर, जि. नादिया, पश्चिम बंगाल)असे अटक केलेल्याचे नाव आहे. पूलवामा हल्ल्यानंतर लष्कराची माहिती तसेच जवानांची यादी दहशतवाद्यांना पुरविल्या प्रकरणी बिहार ‘एटीएस’ने काही दिवसांपूर्वी पाटणा जंक्शन येथून बांग्लादेशातील झेनुडा जिल्ह्यातील खैरूल मंडल आणि अबू सुलतान यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडून लष्कराची माहिती असणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. दोघेही बांग्लादेशातील बंदी घातलेल्या जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती उघड झाली होती. त्यांचा साथीदार शरियत हा पुणे जिल्ह्यातील चाकणजवळील खालुंर्बे परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती बिहार ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे बिहार ‘एटीएस’ने पुणे ‘एटीएस’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित संशयिताची माहिती दिली. त्यानंतर बिहार एटीएस पुण्यात दाखल झाले. शरियत खालुंर्बे गावात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या ठिकाणी काम करत होता. त्यानुसार पोलिसांकडून त्याच्या हालचालीवर पाळत ठेवून गुरुवारी शरियतला ताब्यात घेतले. त्यानंतर शरियतला प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून बिहार ‘एटीएस’चे पथक रेल्वेने बिहारला रवाना झाले. चाकण पोलिसांना या कारकाईबाबतची माहिती देण्यात आली नव्हती.
शरियतकडून महत्वाची कागदपत्रे जप्त
पुलवामा हल्ल्यानंतर जवानांच्या पोस्टिंगसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे जवळ बाळगल्याप्रकरणी शरियतला बिहार एटीएसने चाकणमधून अटक केली. तो हिंदुस्थानातील विविध राज्यात जाऊन तेथील मुस्लिम तरुणांना संघटनेत सामील होण्याचे आवाहन करत असल्याचे प्राथमिक तपासत उघड झाले आहे. त्याच्याकडून इसिस व इतर दोन दहशतवादी संघटनेची भित्तीपत्रके, हँडबील, दोन बनावट मतदान ओळखपत्र, बनावट पॅनकार्ड, तीन मोबाईल व एक मायक्रोचीप जप्त करण्यात आली आहे. शरियत अनाधिकृतपणे खालुंर्बे गावात राहत होता. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षिततेसाठी कश्मीरमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणूक आदेशाची छायांकित प्रत त्याच्याकडे आढळून आली आहे. शरियत आंतकवादी संघटन असलेल्या इस्लामिक स्टेट बांग्लादेशचा सदस्य असून तो हिंदुस्थानात आयएसआयएस संघटनेच्या स्थापन आणि विस्ताराचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
वर्षभरात चाकणमधून दहशतवाद्याच्या अटकेची दुसरी घटना
पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांना जेरबंद केल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी खलिस्तानवादी चळवळीशी निगडीत असलेल्या संबंधिताला एटीएसच्या पथकाने जेरबंद केले होते.
































































