
पर्यटनासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरॅव्हॅन आणि कॅम्पर व्हॅनला वाहन करात सवलत देण्याचा महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. ज्या कॅरॅव्हॅन किंवा कॅम्पर व्हॅन पर्यटन विभागाच्या पर्यटन संचालनालयाअंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांना ही सूट मिळणार आहे.
महाराष्ट्र सरकारने 15 मार्च 2021 रोजी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणाला मंजुरी दिली होती. त्यानंतर कॅरॅव्हॅन किंवा कॅम्परव्हॅनला करात सूट देण्याचा निर्णय विचाराधीन होता. 27 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र सरकारच्या वाहन वाहतूक विभागाने सरकारी अधिसूचनेमध्ये सुधारणा केली आणि धोरणांतर्गत नोंदणी केलेल्या करात सूट देण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी, कॅरॅव्हॅन किंवा कॅम्पर व्हॅन राज्य सरकारला 5,500 रुपये प्रतिचौरस मीटर वाहन कर भरत आहेत. मोठय़ा व्हॅनसाठी कराची रक्कम सुमारे 1.4 लाख रुपये आहे. त्यामुळे कोविडच्या कठीण काळात महाराष्ट्र टुरिझमचा हा उपक्रम एक उभारी देणारा आहे आणि ज्यांनी स्वतःची नोंदणी केली आहे अशा सर्व कॅरॅव्हॅन आणि कॅम्पर व्हॅन ऑपरेटर्सना फायदा व्हावा हा त्यांचा उद्देश आहे.
डॉ. धनंजय सावळकर, सहसंचालक, पर्यटन संचालनालय म्हणाले, ‘कॅरॅव्हॅनसाठी कर सूट हे ऑपरेटर्सना प्रोत्साहित करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवासाची दिशा बदलेल आणि राज्यात कॅरॅव्हॅन इकोसिस्टम स्थापन होण्यास मदत होईल.’
मोटोहोम कॅरॅव्हॅनला आदित्य ठाकरे यांनी दाखवला झेंडा
मोटोहोम कॅरॅव्हॅन हा महाराष्ट्राच्या कॅरॅव्हॅन पर्यटन धोरणांतर्गत नोंदणी करणारा पहिला कारवाँ होता. राष्ट्रीय पर्यटनदिनी म्हणजेच 25 जानेवारी 2022 रोजी मोटोहोम कॅरॅव्हॅनला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे फ्लॅग ऑफ केला.
























































