मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि अदानींना नोटीस, राजशिष्टाचार का पाळला नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले पण सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना आमंत्रणच दिले नाही. उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचार पाळला नसल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री कार्यालयाने सिडको आणि अदानी कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पण या कार्यक्रमाचे निमंत्रण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देण्यात आले नव्हते.  दुसरीकडे मंत्री आदिती तटकरे यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते.

उद्योगपती अदानी यांच्या कंपनीने नवी मुंबई विमानतळ बांधला आहे. या विमानतळात सिडकोची 26 टक्के भागीदारी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातेही आहे. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार सिडकोने एकनाथ शिंदे यांना आमंत्रण देणे आवश्यक होते.

तातडीने खुलासा द्या!

मुख्यमंत्री कार्यालयाने बजावलेल्या नोटीसनुसार या सोहळ्यात राजशिष्टाचाराचे पालन का केले नाही. जिल्हाधिकारी व सिडको प्रशासनाने कार्यक्रमाची आखणी करताना नियम का पाळले नाहीत अशी विचारणा मुख्यमंत्री कार्यालयाने केली आहे. याचा त्वरीत खुलासा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहेत.