काँग्रेसमध्ये गडबड घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार निवडीच्या घोळामुळे कॉँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. हे कमी म्हणून की काय नागपुरातील कॉँग्रेस नेते आशीष देशमुख यांनी उमेदवार निवडीवरून उडालेला गोंधळ आणि याआधीच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांच्या झालेल्या पराभवाच्या मुद्दय़ावरून नाना पटोले यांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटविण्याची मागणी केली आहे. यामुळे महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसमध्ये काहीतरी गडबड घोटाळा असल्याचे समोर आले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला मतदान केले, त्या घटनेची चौकशी झाल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यासंदर्भाने अद्यापही कुणावरही कारवाई झालेली नाही. कॉँग्रेसने उमेदवारी देऊनही निवडणूक अर्ज दाखल केला नाही, पक्षशिस्त मोडली या कारणास्तव डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन केले असले तरी युवक कॉँग्रेसमध्ये सक्रिय असणारे सत्यजित तांबे यांच्याबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता असताना अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. सत्यजित यांच्यावर कारवाई करण्याच्या मुद्दय़ावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र सध्यातरी कॉँग्रेसमध्ये आहे.

बाळासाहेब थोरात थंड
नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना घडलेल्या नाटय़मय घडामोडीच्या वेळी सत्यजित यांचे मामा आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मुंबईत होते. तांबे पिता-पुत्राने दगा दिल्याने महाविकास आघाडीचा एक प्रमुख पक्ष असणाऱया काँग्रेसची निवडणुकीच्या राजकारणात चांगलीच फजिती झाली. नाशिकमध्ये असे का घडले, याबाबत थोरातच सांगू शकतील, असे कॉँग्रेसचे राज्यातील नेते उघडपणे सांगत आहेत. मात्र, थोरातांकडून अद्यापही कोणती प्रतिक्रिया या विषयात आलेली नाही. त्यांनी आपल्या स्वभावाला साजेशी थंडपणाची भूमिका सध्या तरी घेतल्याने काहीतरी गडबड असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अजितदादांच्या गुगलीने संशयकल्लोळ
नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाटय़मय घडामोडीमुळे कॉँग्रेसमध्ये पुरता गोंधळ उडालेला आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नाशिकमध्ये काहीतरी वेगळे घडत असल्याचे आपल्या कानावर येत होते. बाळासाहेब थोरात यांना आपण त्याची कल्पना दिली होती, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली. अजितदादांच्या या गुगलीने कॉँग्रेसमध्ये संशयकल्लोळ सुरू झाला आहे. थोरातांना हे माहीत होते तर त्यांनी ते वेळीच का थांबवले नाही? या कारस्थानामध्ये त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग तर नव्हता ना? अशी चर्चा रंगली आहे.

‘नाना’ना हटवा
सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली असून त्याला नाना पटोले हेच जबाबदार आहेत. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव, त्यानंतरच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा धक्कादायक पराभव, विधानसभेत बहुमत चाचणी वेळी काँग्रेसच्या दहा आमदारांची गैरहजेरी आणि आता सत्यजित तांबे यांची बंडखोरी या सगळ्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. त्यामुळे नाना पटोले यांची तत्काळ प्रदेश अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आशीष देशमुख यांनी थेट कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून केली आहे.