काँग्रेसच्या पराभूत मानसिकतेसोबतच नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर कार्याध्यक्षांचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
balasaheb-thorat

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसला हात देण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण राज्यातील काँग्रेस नेत्यांची पराभूत मानसिकता, अंतर्गत वादांच्या आव्हानांसोबत केंद्रीय नेतृत्वाने दिलेले काँग्रेसचे पाच कार्याध्यक्षच बाळासाहेब थोरात यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामापर्व सुरू झाले. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील इतर नेत्यांनीही राजीनामा देण्यास सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह मिलिंद देवरा यांनीही मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांचा राजीनामा दिल्लीतील नेतृत्वाने मंजूर केला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. थोरात यांचे हात मजबूत करण्यासाठी दिल्लीतील काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाने पाच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली. त्यात विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, डॉ. नितीन राऊत, मुझफ्फर हुसेन व बसवराज पाटील यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पूर्वी माणिकराव ठाकरे प्रदेशाध्यक्ष असताना 2008 मध्ये जयवंतराव आवळे यांच्यावर काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनी एकाच वेळेस पाच कार्याध्यक्ष दिले आहेत. पण पाच कार्याध्यक्षांची कामाची पद्धत व विचार करण्याची पद्धत वेगळी असल्याने पाच जणांचे एकमत करण्याचे नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

पक्षनेतृत्वाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या समित्याही स्थापन केल्या आहेत. अशा वेळेस प्रदेशाध्यक्षांना निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्याची प्रमुख भूमिका पार पाडावी लागणार आहे. उमेदवार निवडीपूर्वी पाच कार्याध्यक्षांची मते विचारात घ्यावी लागेल.

मंगळवारच्या बैठकीकडे लक्ष

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून काँग्रेस पक्ष अजूनही सावरलेला नाही. वास्तविक प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याचा मोठा सोहळा काँग्रेसमध्ये असतो. पण थोरात यांच्याकडे वेळ फार कमी आहे. येत्या 16 जुलैला काँग्रेसची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात या आव्हानांचा कसा सामना करतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.