जागतिक पातळीवर गौरव झालेले महाविकास आघाडीचे सरकार कपटाने पाडले; जयंत पाटील यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक चांगली कामे केली. त्याची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली. कर्जमाफी देण्याचा निर्णय आम्ही सर्वप्रथम घेतला, कोविडच्या काळात देशभरात कौतुक होईल इतके काम केले. मात्र कपटाने सरकार पाडण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

फुटीर आमदारांच्या मतदारसंघात लोकांच्या मनात संतापाची लाट आहे. लोकं त्यांना धडा शिकवायला तयार आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. हे आमदार निवडणुकांसाठी बाहेर पडतील, तेव्हा त्यांना खोक्यांचा हिशेब द्यावा लागेल, असेही पाटील म्हणाले. आपण आपला महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले.

सध्याच्या सरकारमध्ये ज्याला मुख्यमंत्री व्हायचे होते त्याला उपमुख्यमंत्री केले आणि ज्याला उपमुख्यमंत्री व्हायचे होते त्याला मुख्यमंत्री केले. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राला प्रत्येक गोष्टीत कमीपणा घ्यावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारने वेदांताचा प्रकल्प खेचून महाराष्ट्रात आणला होता तो प्रकल्प या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे गुजरातला गेला. इतरही प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून इतर राज्यात जात आहेत, अशी टीका त्यांनी केली.