
बंडखोर आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची टांगती तलवार असताना राज्यपाल महोदयांना हाताशी धरून घटनाबाह्य पद्धतीने महाराष्ट्रात सत्तारूढ झालेल्यांच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
‘सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे. या देशाची न्यायव्यवस्था, कायदा, घटना याच्यावरती विश्वास ठेऊनच आम्ही आजपर्यंत काम करत राहिलेलो आहोत. महाराष्ट्र सरकार संदर्भातील खासकरून ज्या प्रकारे हे राज्यामध्ये बेकायदेशीर सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला आहे, लादलेला आहे. मग त्यासाठी राजभवनाचा वापर केला, विधीमंडळाचा वापर केला. या सगळ्या अन्यायाविरुद्ध शिवसेना महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्यावतिने सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. आम्हाला विश्वास आहे की या देशात लोकशाही आहे की नाही, या देशाचा-राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालतोय की नाही, की तिथे दाबदबाव आणि दडपशाही आहे या फैसला या निमित्ताने लागेल’, असे संजय राऊत म्हणाले.
‘संपूर्ण देश सुप्रीम कोर्टाकडे एका अपेक्षेने पाहतोय. जो काही निर्णय घ्यायचा तो सुप्रीम कोर्ट घेईल. पण समोरच्या बाजूने सुप्रीम कोर्ट सुद्धा आमच्या खिशात आहे आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल अशी वक्तव्य केली जातेय त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे. सुप्रीम कोर्ट हे कोणाच्या खिशात असू शकत नाही. या देशाची न्यायव्यवस्था कोणाची बटिक, गुलाम असू शकत नाही अशी आमची भावना आहे. म्हणून आम्ही अत्यंत अपेक्षेने आणि आशेने सर्वोच्च न्यायालयाकडे पाहतो’, असेही राऊत यावेळी म्हणाले.
जनता शिवसेनेसोबतच
‘आदित्य ठाकरे मुंबईत जी निष्ठायात्रा काढत आहेत त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आजही शिवसेनेसोबत आहेत. असली-नकलीचा जो मुद्दा आहे त्याचा प्रभाव लोकांवर नाही. आम्ही सर्व महाराष्ट्रात फिरतोय. मी काल नाशिकमध्ये होतो, लोक हजारोंच्या संख्येने भेटायला येताहेत. याचा अर्थ शिवसेना ही शिवसेना असून जे बाहेर पडले त्यांनी आपले भविष्य स्वत: पहावे. शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरून आपल्या पोळ्या भाजण्याचे काम न केल्यास जनतेवर उपकार होतील. जनता शिवसेनेसोबत आहे आणि राहील’, असेही राऊत म्हणाले.
विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र
गोव्यामध्ये काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ‘संपूर्ण देशभरात विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र आहे. लोकशाहीला जो धोका आहे त्याबाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे डोळे लावून बसलो आहोत. महाराष्ट्रात जो निर्णय होईल तो देशाच्या राजकीय भविष्याबाबत आशादायी असेल.’
























































