
डिझेल टंचाईतून झालेल्या इंधन दरवाढीमुळे स्कूल बसचेही मोठे ‘वांदे’ झाले आहेत. इंधन दरवाढीचा थेट फटका सामान्य पालकांना बसू नये म्हणून आठवड्यातून दोन दिवस ऑनलाइन शाळा घ्या आणि तीन दिवसच प्रत्यक्ष शाळा भरवा, अशी सूचना स्कूल बस मालक संघटनेने राज्य सरकारला केली आहे. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी इंधन दरवाढ न थांबल्यास मुंबईसह संपूर्ण राज्यभर शाळांचे वर्ग ऑनलाईन भरवण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत.
देशात लागोपाठ इंधन दरवाढीचा भडका उडत चालला आहे. या दरवाढीमुळे सर्वच वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक गणित कोलमडले असून याचा मोठा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात शहरी आणि ग्रामीण भागातही शाळकरी मुलांची ने-आण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर स्कूलबसेस सेवेत आहेत. या बसेसनाही इंधन दरवाढीची झळ बसली आहे. नवे शैक्षणिक वर्ष पुढील जून महिन्यापासून सुरू होत आहे; परंतु शाळेपर्यंत पोहोचवणाऱया स्कूल बसचा वेग इंधन दरवाढीमुळे मंदावत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा आधार घ्यावा लागेल किंवा शाळांना ऑनलाईन वर्ग चालवावे लागतील, अशी स्थिती आहे. याचदरम्यान स्कूल बसमालकांच्या संघटनेने इंधन पुरवठा पूर्ववत होईपर्यंत शाळा आठवडय़ातून केवळ 3 दिवस भरवण्याची मागणी केली आहे. दरवाढीमुळे जुन्या दरात स्कूलबसची सेवा सुरू ठेवणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही, असे म्हणणे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने मांडले आहे. याच अनुषंगाने आठवडय़ातून दोन दिवस ऑनलाइन शाळा घेण्याची सूचना करीत संघटनेने राज्य सरकार आणि परिवहन विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. या सूचनेवर राज्य सरकारकडून कोणती भूमिका घेतली जात आहे याकडे स्कूलबस ओनर्स असोसिएशनसह शाळा आणि पालकवर्गाचे लक्ष लागले आहे.
स्कूल बस ओनर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, मुंबईसह राज्यभरातील स्कूल बस मालकांना आधीपासूनच गाडय़ांची देखभाल, विमा प्रीमियम, परमिट शुल्क, कर्मचाऱ्यांचा पगार तसेच इतर प्रशासकीय खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यात आता डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरवाढीमुळे बस मालकांची चिंता प्रचंड वाढली आहे.
नागपुरात स्कूल बसची 15 टक्के भाडेवाढ होणार
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे नागपूर स्कूल बस व स्कूल व्हॅन संघटनेने आपल्या सेवा शुल्कात तब्बल 10 ते 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा जे पालक दरमहा 1 हजार भाडे देतात, त्यांना यापुढे 1200 रुपये, तर 2 हजार रुपये भाडे देणाऱया पालकांना 2400 रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
व्हॅटचा दर कमी करा!
स्कूल बस ओनर्स असोसिएशनने ऑनलाइन शाळा घेण्याचा प्रस्ताव सादर करतानाच अनुदान आणि स्कूल बससाठी व्हॅटचा दर कमी करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे 1 जूनपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी. तसेच स्कूल बस क्षेत्राला तातडीने दिलासा देत अनुदान किंवा सवलत जाहीर करावी, अशी मागणी स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केली आहे.
आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पालकांवर दरवाढीचा आणखी बोजा नको म्हणून आम्ही राज्य सरकारला आठवडय़ातून दोन दिवस ऑनलाइन शाळा घेण्यासंदर्भात विनंती केली आहे. तसेच शाळांना सर्वच वर्ग एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून बसेसना वारंवार फेऱया माराव्या लागणार नाहीत आणि त्यातून इंधन बचतही होईल.
अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस ओनर्स असोसिएशन






























































