
हिवाळी अधिवेशनासाठी सरकार नागपूर मुक्कामी आले असून अधिवेशनकाळात विधिमंडळावर तब्बल शंभर मोर्चे धडकणार आहेत. मोर्चांचा हा आकडा पाहून सरकारला टेन्शन आले असून आतापर्यंत 57 मोर्चांनाच परवानगी देण्यात आली आहे.
राज्यात समस्या आणि प्रश्नांची बजबजपुरी माजली आहे. प्रत्येक घटक नाराज आहे. त्यामुळेच सरकारविरोधात प्रचंड रोष असून त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात सभागृहात आणि बाहेरही उमटणार आहेत. त्यात विधान भवनावर धडकणाऱ्या मोर्चांचा आकडा शंभरच्या घरात जाणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी नऊ मोर्चे
पहिल्याच दिवशी विविध संघटनांचे 9 मोर्चे विधिमंडळावर धडकणार आहेत. दहा दिवसांत 57 मोर्चे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढले जाणार आहेत.
गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून विविध संघटनांचे मोर्चे यशवंत स्टेडियम येथून विधिमंडळाकडे कूच करणार आहेत. यात विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना अमरावतीतून नागपुरात धडकणार आहे. रिपब्लिकन चर्मकार महासंघ गुरू रविदास महाराज सांस्कृतिक भवन उभारण्याच्या मागणीसाठी, तर भीम आर्मी भारत एकता मिशन आरोग्य व्यवस्थेतील अनागोंदीविरोधात साखळी उपोषण करणार आहे.
तापी बुराई जलसंघर्ष समिती, आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी समायोजन कृती समिती, विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी संघ तसेच अन्य मोर्चेही निघणार आहेत.

























































