विक्रोळीचे फुले रुग्णालय ‘सलाइनवर’! तातडीने दुरुस्तीची शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,मुंबई

इमारतीला टेकू, गळके छप्पर आणि धोकादायक इमारतीमुळे विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर येथील पालिकेचे महात्मा फुले रुग्णालय अक्षरशः ‘सलाइन’वर आहे. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाल्याने दररोज रुग्णालयात येणारे शेकडो रुग्ण आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महात्मा फुले रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत आज शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना करा, अशी मागणी केली. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. रुग्णालयातील समस्यांबाबत पालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील अद्याप दखल घेतली जात नसल्याचे आमदार सुनील राऊत यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आल्याचे ते म्हणाले. त्यामुळे येत्या दोन दिवसांत याबाबत रुग्णालयाच्या सुरक्षेबाबत निर्णय घेऊन कार्यवाही करावी, असेही राऊत म्हणाले. यावेळी स्थापत्य समिती अध्यक्ष उपेंद्र सावंत, उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, अनंत पाताडे, विभाग संघटक परम यादव, शाखाप्रमुख अभय राणे, राजेश सोनवळे, हितेश पटेल, सत्यानंद, मधुकर पोवळे आदी उपस्थित होते.

अपघात घडल्यास जबाबदार कोण?

तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांच्या उपस्थितीत वर्षभरापूर्वी घेतलेल्या बैठकीत संबंधितांना इमारतीच्या पुनर्विसाचे आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यावेळी जून 2019 मध्ये पुनर्विकासाचे भूमिपूजन करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अजूनही प्रशासनाकडून आराखडा तयार नसल्याचे कारण देण्यात येत आहे. त्यामुळे दुर्दैवाने अपघात घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल सुनील राऊत यांनी केला आहे.