
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या विदर्भात भाजपला चांगलाच हादरा बसला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या जागेपाठोपाठ गेले दोन टर्म म्हणजे 12 वर्षे ताब्यात असलेल्या अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजप उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना पराभव पत्करावा लागला. जवळपास 30 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे कॉँग्रेस उमेदवार धिरज लिंगाडे 3382 मतांनी विजयी झाले.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असणाऱया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसने विधान परिषद निवडणूक एकत्रपणे लढविण्याचा निर्णय घेत भाजपपुढे कडवे आव्हान उभे केले होते. महाविकास आघाडीच्या एकजुटीमुळे पूर्व व पश्चिम विदर्भात विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग लागला. अमरावती पदवीधरमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला. रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असल्याने त्यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सत्ताधारी भाजप व महाविकास आघाडीमध्ये चुरशीच्या लढती झाल्या. त्यातील चार मतदारसंघांतील निवडणुकीचे निकाल मतमोजणीच्या पहिल्याच दिवशी लागले. अमरावती पदवीधरचा निकाल मात्र रखडला होता. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून कॉँग्रेसचे धीरज लिंगाडे आघाडीवर होते. मात्र, भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांनी बाद झालेल्या मतांवर आक्षेप घेतला व फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानुसार पुन्हा मतमोजणी सुरू झाली. ही मतमोजणी जवळपास 30 तास चालली. त्यात धीरज लिंगाडे विजयी झाले.
रणजित पाटलांना अवैध मतांचा फटका
मतमोजणीमध्ये 8 हजार 735 मते अवैध ठरली. महत्त्वाची बाब म्हणजे जवळपास 4 हजारांवर मतदारांनी भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्या नावापुढे केवळ 2 हा पसंतीक्रम क्रमांक लिहून मतदान केले. मात्र, या मत पत्रिकांवर पहिल्या पसंतीचे मतच नोंदवीले नसल्याने त्या बाद ठरल्या. या 4 हजार अवैध मतांचा फटका रणजित पाटील यांना बसला.
मतमोजणी केंद्रावर अधिकाऱयाचा मृत्यू
अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावर मंडल अधिकाऱयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी इथले मंडल अधिकारी शाहूराव खडसे हे डय़ुटीवर होते.
विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा कुणीच पूर्ण केला नाही
अमरावती पदवीधरसाठी एकूण 1,02,403 मतदान झाले होते. त्यातील बाद मते वगळून विजयासाठी आवश्यक 47101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. मात्र, मतमोजणीच्या 21 फेऱयांनंतरही एकही उमेदवार तो पूर्ण करू शकले नाहीत. अंतिम दोन उमेदवारांमध्ये धीरज लिंगाडे यांना 46,344 व रणजीत पाटील यांना 42,962 मते मिळाली. शेवटी सर्वाधिक मते मिळाल्याने लिंगाडे यांना पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी विजयी घोषित केले






























































