
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली. आतापर्यंत 160 बाजार समित्यांच्या निकालात 90 जागांवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की येथे गद्दारीला स्थान नाही. आता आगामी निवडणुकांमध्येही हे दिसेल,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला दणदणीत यश प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की येथे गद्दारीला स्थान नाही. हेच आपल्याला येत्या लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार आहे,’ असे ट्विटमध्ये नमूद करून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
जनतेचा कल दाखवून देणारे हे यश
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेले घवघवीत यश महाराष्ट्रातील जनतेचा कल पुन्हा एकदा दाखवून देणारे आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी जनतेचे आभारही मानले आहेत.शिंदे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकऱयांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने 1200 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. शिवाय बाजार समितीच्या निवडणुका अधिक किचकट करण्याचा प्रयत्नदेखील शिंदे सरकारने केला. त्यामुळे याविरोधात शेतकऱयांनी, व्यापाऱयांनी जनमत किती मोठे आहे हे दाखवून दिले आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी सरकारला लगावला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला भेगा पडल्या अशी टीका करण्यात आली; परंतु ही वज्रमूठ अभेद्य आहे आणि फार मोठय़ा क्षमतेची आहे हे विरोधकांना कळले असावे, असेही ते म्हणाले.
ही शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली पहिली लाथ
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले निर्विवाद यश म्हणजे शेतकऱयांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कंबरडय़ात मारलेली पहिली लाथ आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे मिंधे गटातील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विजयी झाली आहे, असे संजय राऊत म्हणाले. ज्या आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली त्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे, हा लोकमताचा कौल आहे, असेही ते म्हणाले. ही तर केवळ सुरुवात आहे, आगामी निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच, हिंमत असेल तर सरकारने निवडणुकीला सामोरे जावे, असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबईत दौऱ्यावरूनही त्यांनी टोला लगावला. महाविकास आघाडीची सभा पाहण्यासाठी ते मुंबईत येत आहेत. गेल्या वेळी नागपूरमध्ये झालेल्या सभेच्या वेळी ते महाराष्ट्रात आले होते,’ असे खासदार राऊत म्हणाले.




























































